काही कैद्यांना जेलमधून पळून जायची भारीच हौस असते, ‘कानून के हात बडे लंबे होते है भाई!’ हे यांना कसं कळतं नाही बुवा. पळताना मेंदू कुठे गहाण ठेवतात कळतच नाही. या जेलमधून पळ काढल्यानंतर आपण पकडलो जाणार हे माहिती असूनही कशाला खटाटोप करतात हे? असा प्रश्न कधी कधी डोक्यात येतो. बरं तेही जाऊ दे काहीजण असे ‘महाभाग’ असतात की पळून जाण्यासाठी काय काय शक्कल लढवतील ना याचा काही नेम नसतो. त्यांचे ‘पलायन’ काही केल्या यशस्वी तर होत नाहीच पण त्यांचे हे धाडस पाहून ‘हे खरंच डोक्यावर पडले आहेत का?’ असं तोंडात आल्यावाचून राहत नाही. आता याच शहाण्याला बघा ना! तुरूंगातून त्याला पळ काढायचा होता पण पळणार तरी कसं ? तेव्हा याच्या ‘सुपिक’ डोक्यात एक कल्पना आली. आपलं पलायन यशस्वी होणार नाही तेव्हा बाईचं रूप धारण करून पळून पाहूया असं याच्या मनात आलं. मग काय साक्षात बाई बनून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं हे पलायननाट्य काही यशस्वी झालं नाही, उलटं आपल्या मुर्खपणाने त्याने इतरांचं आणि नेटिझन्सचं मनोरंजन केलं ते वेगळं.
होंडूरसच्या तुरूंगात एक मजेशीर प्रकार घडला. फ्रान्सिस्को या ५५ वर्षींय कैद्याला खुनाच्या आरोपावरून तुरूंगवासाची शिक्षा झाली होती. पण त्याला काही तुरूंगात राहवेना. तेव्हा पळून जाण्याचं त्यांनं ठरवलं. त्याला भारीच कल्पना सुचली त्याने बाईचा वेश धारण केला, तोकडा वनपीस घातला, डोळ्यावर गॉगल, मोठ्या केसांचा विग, बोटांना नेलपेंट लावून हा निघाला. आश्चर्य म्हणजे तुरूंगात ठिकठिकणी सुरक्षा रक्षकही होते पण त्यातल्या एकालाही शंका आली नाही. आता शंका आली नाही की आणखी काही हे मात्र गुलदस्त्यातच आहे. तुरूंगातल्या आतल्या भागातून पळून जाण्यात तो यशस्वी झाला पण मुख्य गेटवर पोहोचताच त्याची चोरी पकडली गेली. कारण त्याने बाईसारखं दिसावं यासाठी ज्या हाय हिल्स घातल्या होत्या त्याने त्याला काही चालता येईना. त्याच्या विचित्र चालण्याच्या पद्धतीवरून इथल्या सुरक्षारक्षकांना शंका आली आणि पुढच्या मिनिटाला त्याचे बिंग फुटले. आता कहर म्हणजे पोलिसांनी चौकशी करायला सुरूवात केल्यावर आपण महिलेसारखं नाजूक आवाजात बोलावं हेही त्याच्या लक्षात आले नाही. तेव्हा तो बाई नसून पुरूष आहे हे ओळखायला सुरक्षारक्षकांना काही वेळ लागला नाही. आता पळून जायची तयारी केली तर एवढ्या साध्या गोष्टी तरी करायला हव्यात हेही या त्याच्या लक्षात आले नाही. तेव्हा त्याचा हा अवतार बघून अनेकांना आपले हसू अनावर झाले.