एखादी आपातकालीन परिस्थिती उद्भवल्याशिवाय वैमानिकाकडून सहसा विमान अचानकपणे लँड करण्याचा निर्णय घेतला जात नाही. यासाठी विमानातील इंधन संपणे, विमानात तांत्रिक बिघाड उद्भवणे, हवामान खराब होणे, अशी कारणे असू शकतात. मात्र, कतार एअरवेजच्या विमानात नुकताच एक विचित्र प्रकार घडला. एका जोडप्याच्या भांडणामुळे हे विमान चक्क मध्येच खाली उतरवावे लागले. हे विमान चेन्नई येथे अचानकपणे उतरविण्यात आले.
कतार एअरवेजचे विमान दोहा येथून बाली येथे जात होते. या विमानातून एक इराणी दाम्पत्य आपल्या मुलासह प्रवास करत होते. पती झोपल्यानंतर पत्नीने त्याच्या अंगठ्याचा वापर करुन त्याचा मोबाइल अनलॉक केला. हा मोबाईल पाहिल्यानंतर तिला धक्का बसला आणि आपला नवरा आपली फसवणूक करत असल्याचे तिचे लक्षात आले. या रागाच्या भरात ती खूप दारु प्यायली. या नशेतच तिने नवऱ्याशी भांडायला सुरूवात केली. या दोघांनाही थांबविण्यास गेलेल्या विमानातील कर्माचाऱ्यांशीही या महिलेने गैरवर्तन केले. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर विमान खाली उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
चेन्नईत या दाम्पत्याला आणि त्यांच्या मुलाला खाली उतरविण्यात आले. महिलेची नशा उतरेपर्यंत तिला विमानतळावर थांबविण्यात आले. नशा उतरल्यानंतर तिला पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली.