ज्या वयात लहान मुले आपल्या बोबड्या आणि अडखळत बोलण्याने आई बाबा आणि नातेवाईकांची मने जिंकतात. त्या वयात रशियातील एका चिमुकलीने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत. चार वर्षाच्या चिमुकलीने बोबड्या बोलाने नव्हे तर चक्क सात भाषा अवगत असल्याचे दाखवून देत सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडले आहे. तिच्या जीभेवर रुळणाऱ्या सात भाषांमुळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
बेला देवियांतिकीनाच्या जीभेवर आपल्या वयापेक्षा जास्त भाषा रुळत आहेत. मातृभाषा असणाऱ्या रशियन भाषेसह या चिमुकलीने इंग्लिश, जर्मन, स्पनिश, फ्रेंच, चिनी आणि अरबी अशा सहा भाषांवर प्रभूत्व मिळवले आहे.
बेलाच्या जीभेवर सहज रुळणाऱ्या विविध भाषेचा साक्षात्कार एका रशियन वाहिनीवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर आला. बेलाने टिव्ही कार्यक्रमामध्ये दाखवलेले प्राविण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जगातील अशा अजब गजब लोकांना जगासमोर आणणा-या एका कार्यक्रमात बेला सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने आपल्यातील कौशल्य दाखवून दिले. बेलाने या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचीच नव्हे तर कार्यक्रमातील परिक्षकांची मने जिंकून पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. या कार्यक्रमातील विजेत्यास २० हजार डॉलर बक्षिस मिळणार आहे.
या कार्यक्रमामध्ये टिव्हीवर इंग्लिश आणि फ्रेंच भाषेतील उत्तरे ती अन्य भाषेत न स्पष्टपणे देताना दिसते. यावेळी ती स्पॅनिश गाणे देखील गुणगुणताना दिसते. आपल्या मुलीचे कौशल्यावर बोलताना आई युलिया यांनी जन्मापासून तिचे इंग्लिश आणि रशियन भाषेवर प्रभुत्व असल्याची माहिती कार्यक्रमामध्ये दिली. बेलाने तिला सांभाळकरणाऱ्या दाईची भाषा पटकन आत्मसात केल्याचा किस्सा देखील युलिया यांनी या कार्यक्रमात सांगितला.