‘ही आहे माझी कोंबडी जोकू, जी उत्तम पियानो वाजवते.’ असं म्हणत जेव्हा दोन महिला आपल्या कोंबडीला घेऊन अमेरिकेतल्या प्रसिद्ध रिअॅलिटी टॅलेन्ट शोमध्ये आल्या, तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सुरुवातीला त्या कदाचित मस्करी करत असतील असंच परिक्षक आणि उपस्थित प्रेक्षकांना वाटलं, पण पाचव्या मिनिटाला या कोंबडीने खरंच अशी काही कमाल करून दाखवली की, सगळ्यांनी तोंडात बोटंच घातली. या कोंबडीने चक्क पियानो वाजवून दाखवला. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? मग हा व्हिडिओ पाहाच.

अमेरिकेतील प्रसिद्ध रिअॅलिटी शो America’s Got Talentच्या मंचावर हा चमत्कार पाहायला मिळाला. सुरूवातीला दोन तरूणी कोंबडीला घेऊन मंचावर आल्या. ते पाहून सगळे बुचकळ्यातच पडले. त्यात आपली कोंबडी पियानो वाजवणार आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यावर सर्वच जण हसायला लागले. त्या तरुणींची त्यांनी खिल्ली उडवली. परिक्षकांनी पण डोक्यावर हात मारला. या तरूणी मंचावर आपलंच हसू करून घेतायत की काय, असं अनेकांना वाटतं होतं. पण काही मिनिटांतच कोंबडीने आपल्या चोचीने पियानो वाजवायला सुरूवात केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. सगळ्यांनी उठून या ‘स्टार जोकू’चं टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केलं.