प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा कायमच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. आजुबाजूला सुरु असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी टीपणे आणि त्याला प्रतिसाद देणे हे त्यांचे महत्त्वाचे काम असते. सोशल मीडियावरील ट्विटर हँडलवर ते विशेष अॅक्टीव्ह असल्याचे दिसते. नुकतेच त्यांनी एक ट्विट करत एका व्हिडियोचे कौतुक केले आहे. या व्हिडियोमध्ये मांडण्यात आलेली कल्पना अतिशय उत्तम असून आपल्याला या कल्पनेसाठी गुंतवणूक करायला आवडेल असेही त्यांनी म्हटले आहे. भारत अशाप्रकारची कल्पना राबवून एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेऊ शकेल. महिंद्रा राईज (MahindraRise) या आपल्या ट्विटर हँडललाही टॅग करत अशाप्रकारच्या प्रकल्पांना आम्ही उभारी घेणारे प्रकल्प म्हणतो असेही आनंद महिंद्रांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे ट्विट २५ हजारहून अधिक जणांनी पाहिले आहे. अनेकांनी ते लाईक आणि रिट्विटही केले आहे.

हा व्हिडियो आहे खाण्याच्या चमच्यांचा. हे चमचे प्लास्टीक किंवा स्टीलपासून बनविलेले नसून ते ज्वारी, तांदूळ, गहू यांपासून तयार केला आहे. प्लास्टीकच्या चमच्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असल्याचे व्हिडियोमधील व्यक्ती बोलताना दिसतो. वापर करुन झाल्यावर हे चमचे आपण खाऊन टाकू शकतो. ते आरोग्यदायी गोष्टींपासून बनलेले असल्याने त्यापासून कोणताही त्रास होण्याचीही शक्यता नाही असे यामध्ये सांगण्यात आले आहे. या व्हिडियोला द बेटर इंडियाचे सौजन्य देण्यात आले आहे. या व्हिडियोवर ‘सॅल्यूट टू धिस मॅन’ असेही म्हणण्यात आले आहे. हर्ष मारीवाला यांना यामध्ये टॅग करत मला या चमचे तयार करणाऱ्या प्रकल्पाशी जोडून देऊ शकाल का असे त्यांनी विचारले आहे.

याआधीही अनेक गोष्टींना आर्थिक सहाय्य करण्यास आपण उत्सुक असल्याचे महिंद्रांनी ट्विट करत सांगितले होते. फेसबुकसारखीच भारतीय कंपनी असायला हवी असे मत व्यक्त करत भारतातील कोणी तरुण सोशल मीडिया कंपनी काढण्यास उत्सुक असतील तर त्यांना मी आर्थिक सहाय्य करेन असे ते ट्विटरद्वारे म्हटले होते. तसेच IAAF वर्ल्ड अंडर २० अॅथेलॅटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासला आर्थिक मदत करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले होते.