देशात सध्या टिक टॉकचा बोलबाला आहे. टिकटॉकचा व्हिडिओ बनवणारा एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात असून त्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपनंतर आता सर्वांना टिकटॉकचे वेड लागले आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच याचे वेड लागले आहे. अगदी जाहिरातदारांपासून ते चित्रपट कलाकारांपर्यंत अनेकजण टिकटॉकच्या माध्यमातून जास्तीत जास्त युझर्सपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणीही यामध्ये मागे नाहीत. आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा असाच एक टिक टॉकवरील व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पामुला पुष्पा श्रीवानी यांनीही आपला टिकटॉक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या एका निर्णयाचे स्वागत करत आनंदाने गाणं गाताना दिसत आहेत.

कोण आहेत श्रीवानी?

श्रीवानी या आंध्र प्रदेशमधील आदिवासी मंत्री आहेत. त्या राज्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या विशाखापट्टनजवळच्या कुरूपम मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मे महिन्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाच मंत्र्यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. त्यापैकी श्रीवानी एक आहेत.

कोणत्या निर्णयामुळे श्रीवानी यांना झाला आहे आनंद?

आंध्र प्रदेश राज्याच्या तीन राजधान्या निर्माण करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी काही महिन्यांपूर्वी मांडला आहे. या प्रस्तावानुसार विशाखापट्टणम ही प्रशासकीय राजधानी असणार आहे. याच निर्णयाचे स्वागत करण्यासाठी श्रीवानी यांनी हा टीकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे. जगनमोहन यांच्या प्रस्तावानुसार विशाखापट्टणम येथे प्रशासकीय, अमरावती विधिमंडळ तर कुडप्पा न्यायालयीन राजधानीची शहरे असतील. जगनमोहन यांनीच विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली होती.

काय आहे व्हिडिओमध्ये?

श्रीवानी यांच्या व्हायरल झालेल्या टीकटॉक व्हिडिओमध्ये त्या ‘रयालासीमा मुद्दुबिना मना’ हे गाणं गाताना दिसत आहेत. याच रायलसीमामध्ये विशाखापट्टणमचा समावेश होतो. या भागाचा विकास केल्याबद्दल या गाण्यामधून मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

श्रीवानी यांची फिल्मी पार्श्वभूमी

श्रीवानी यांनी नुकतीच एका तेलगू चित्रपटामध्ये छोटी भूमिका साकारली होती. सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी ही भूमिका साकारल्याचे सांगण्यात आलं होतं. तसेच ‘अमृत भूमी’ या चित्रपटातही त्यांनी शिक्षिकेची भूमिका साकारली होती.