‘बाबा मला आजपासून हिजाब घालायचा नाही’ असं सौदीत राहाणाऱ्या वडिलांना एक मुलगी कळवळून सांगत होती, आता सौदी अरेबियासारख्या देशात मुस्लिम महिलांना आयबा घालून फिरणे बंधनकारक आहे. घरातून बाहेर पडतानाच महिलांना नखशिखांत पूर्णपणे झाकणारा आयबा घालावा आणि जर त्यांनी या नियमाचे पालन केले नाही तर त्यांची जी काही अवस्था केली जाते याची कल्पनाही आपल्याला करवणार नाही. जिथे पुरुषांच्या लेखी स्त्रियांना कोणतेही अस्तित्त्वच नाही, अशा समाजात वावरणाऱ्या वडिलांकडे एका मुलीने मागणी केलीय ती कायमस्वरूपी हिजाबपासून सुटका करण्याची. अशा कट्टरपंथीय देशात राहाणाऱ्या वडिलांनी आपल्या मुलीला जे काही उत्तर दिले ते मात्र खूपच कौतुकास्पद होते. ‘तुला हिजाब योग्य वाटत नसेल तर तो नको घालूस, तू जे काही करशील ते योग्यच असेल आणि वडील या नात्याने मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभा राहिन’.

अमेरिकेत राहात असलेल्या लाम्म्याने आपल्या वडिलांना एक संदेश पाठवला. निमित्त होतं ते हिजाबपासून कायमस्वरुपी फारकत घेण्याचे. सध्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे, त्यामुळे इथल्या अनेक मुस्लिमांना धर्मभेद, वंशभेदाचा सामना करावा लागतो आहे , अर्थात लाम्म्यालाही याचा खूप जवळून अनुभव आला. तेव्हा या वाईट अनुभवाबद्दल सौदीत राहणाऱ्या वडिलांना तिने एसएमएसमधून आपल्या मनातल्या भावना लिहून पाठवल्यात. त्या संदेशाचे स्क्रिन शॉट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘तुम्ही इस्लाम धर्माला पाठीशी घालणं थांबवा, जर तू तुझ्या वडिलांना सांगितलं की तुला उद्यापासून हिजाब घालायचा नाही तर ते तुला मारायला सुरूवात करतील’ असे टोमणे सतत तिच्या कानावर पडायचे. शेवटी आपली बाजू तिने वडिलांसमोर मांडली आणि वडिलांकडून या मुलीला मिळालेलं उत्तर हे खुपच कौतुकास्पद होतं, कारण जिथे महिलांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही, अशा ठिकाणी राहत असताना मुलीच्या बाजूने भूमिका घेणं हा धाडसीपणा होता. त्याच्या या भूमिकेवर एका बाजूने कौतुक होतंय तर दुसरीकडे कट्टरपंथीय त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करताहेत. त्यामुळे ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

https://twitter.com/lxmyaa/status/853047555764232192

https://twitter.com/Ur_Sweet_Melody/status/853092367766884352