भारताचा गिर्यारोहक अर्जुन वाजपेयी यांने माऊंट चो ओयू हा शिखर सर करुन नवा विश्वविक्रम केला आहे. जगातल्या सर्वात उंच असलेल्या शिखरांमध्ये चो ओयू हा एक आहे. २३ वर्षाच्या अर्जुनने आपल्या गिर्यारोहण दलातील एका सदस्यासोबत मिळून चो आयू शिखर सर केला. पण याचबरोबर त्याने आपल्या नावे नवा विक्रमही केला आहे. अर्जुन हा माऊंट चो आयू सर करणारा जगातील सगळ्यात तरूण गिर्यारोहक ठरला आहे. माऊंट चो आयू हा जगातील सगळ्यात उंच असलेल्या शिखरांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. समुद्रसपाटीपासून हे शिखर २६ हजार ८६४ फूट उंचीवर आहे.  अर्जुनने सर्वाधिक उंच असलेल्या जगातील १४ शिखरांपैकी ५ शिखर हे सर केले आहेत. त्यांनी माऊंट लहोत्से, माऊंट मनास्लु आणि मकालु हे सर्वाधिक उंचीचे शिखर देखील सर केले आहेत. सात तासांच्या चढाईनंतर त्यांनी चो आयू शिखर सर करत त्यावर तिरंगा फडकवला. विशेष म्हणजे अर्जुनने याआधीही हा शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. पण चढाई करताना तीन दिवस तो बर्फाच्या वादळात अडकून होता. यात त्याच्या हाताला आणि पायाला इजा झाली होती. अर्जुनच्या नावे हाच विक्रम नाही तर वयाच्या १७ व्या वर्षी त्याने माऊंट एव्हरेस्ट देखील सर केला होता.