चार वर्षांपूर्वी २०१६ साली पाकिस्तानातील एक चहावाला एका रात्रीत इंटरनेटवर मोठा स्टार बनला होता. स्थानिक फोटोग्राफरने सोशल मीडियावर या चहावाल्याचा फोटो पोस्ट केल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्ध मिळाली होती. अर्शद खान असे या चहावाल्याचे नाव असून तो पुन्हा एकदा ट्रेंडिंगमध्ये आहे. यावेळी अर्शद खान त्याच्या मॉडेल सारख्या गुडलूकसाठी नाही, तर इस्लामाबादमध्ये सुरु केलेल्या कॅफेसाठी चर्चेत आहे. त्याने तिथे स्वत:च्या मालकीचे कॅफे उघडले आहे.
इस्लामाबादच्या संडे बाझारमध्ये अर्शद खान काम करायचा. मागच्या २५ वर्षांपासून इस्लामाबादमध्ये राहत असून चहा विक्रीचा व्यवसाय करतो, असे त्याने २०१६ साली एका मुलाखतीत सांगितले होते. फोटोग्राफर जियाह अली यांनी अर्शद खानचा चहाच्या स्टॉलवर फोटो काढला होता. मॉडेल सारख्या लूकमुळे अर्शद खानचा हा फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावेळी टि्वटरवर ट्रेंडिगचा विषय बनला होता.
प्रसिद्ध अमेरिकन वेबसाइट बझफीडसह आंतरराष्ट्रीय मीडियाने सुद्धा अर्शद खानची स्टोरी प्रकाशित केली होती. व्हायरल फोटोमुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर अर्शद खानला मॉडलिंग आणि अभिनयाच्या अनेक ऑफर्स मिळाल्या. त्याने मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. अर्शद खान आता पुन्हा इस्लामाबादमध्ये आला असून, त्याने स्वत:च कॅफे सुरु केलं आहे.
डेली पाकिस्तानच्या वृत्तानुसार, अर्शद खानने स्वत:च कॅफे सुरु केलं असून, त्याने ‘कॅफे चायवाला रुफटॉप’ असे नाव दिले आहे. त्याच्या चहाच्या स्टॉलवर चहासोबत १५ ते २० खाद्यपदार्थही मिळतात. “काही जणांनी मला ‘अर्शद खान’ असे कॅफेला नाव द्यायला सांगितले. पण मी नकार दिला, कारण चायवाला ही माझी ओळख आहे” असे ऊर्दू न्यूजशी बोलताना त्याने सांगितले.