आपल्याला अस्खलित इंग्रजी बोलता येत नाही याचा किती न्यूनगंड आहेत आपल्याला. आपली मातृभाषा मुलांना बोलता आली नाही तरी चालेल पण मुलांना फाडफाड इंग्रजी बोलता आले पाहिजे अशीही पालकांची मानसिकता बनत चालली आहे. इंग्रजी ही काही आपली भाषा नाही पण जगाच्या पाठीवर सर्वधिक इंग्रजी भाषा बोलणारे भारतातच आहेत. त्यातून आपल्याकडे भारत विरुद्ध इंडिया अशी फळी तयार होत आहे. भले माणूस कितीही शिकलेला असू दे पण इंग्रजी येत नाही म्हणजे तो अडाणी, अशिक्षित अशी मानसिकता लोकांची होत चालली आहे. पण या सा-यावर मात करून कोणे एके काळी इंग्रजी येत नसलेली ही महिला ‘एशियन बिझनेस वुमन ऑफ द इअर’ बनली आहे.

वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आशा खेमका या आपल्या पतीसोबत इंग्लडला गेल्या. ज्या देशात फक्त इंग्रजीच बोलली जाते तिथे आपलं कसं होणार याचा ताण खेमका यांना होताच. इंग्रजी येत नव्हते पण त्या रडत बसल्या नाही, ना कोणताही न्यूनगंड बाळगला. लहान मुलांचे कार्यक्रम ऐकून ऐकून त्या हळूहळू इंग्रजी भाषा बोलायला शिकल्या. त्यानंतर कार्डिफ विद्यापीठातून त्यांनी  डिग्री घेतली. आता इंग्लडमधल्या एका प्रतिष्ठीत महाविद्यालयात त्या प्राध्यपाक आहेत. तसेच या कॉलेजच्या त्या सीईओ देखील आहेत. बिझनेस डिग्री घेतल्यानंतर काही काळ त्यांनी लेक्चरर म्हणूनही काम केले होते. ६५ वर्षीय आशा यांचे शिक्षण इंग्रजीत झाले नाही, ना त्यांना इंग्रजी बोलता येत होतं,  तरीही या न्यूनगंडावर मात करत त्या शिकल्या. यंदा बंकिंगहम येथे होणा-या बिझनेस अवॉर्ड कार्यक्रमात त्यांना बिझनेस वुमन ऑफ द इअरने सन्मानित करण्यात येणार आहे.