महिलांची सुरक्षितता आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांना दिली जाणारी वागणूक हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. बरेच सेलिब्रिटी ज्या कार्यक्रमांमध्ये जातात तिथे आवश्यकतेनुसार हा मुद्दा सर्वांसमोर उपस्थित करतात. पण, एस. एस. राजामौलींनी तर त्याच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटातून हा विचार थेट एका प्रभावी दृश्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. सध्या या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बऱ्याच नेटिझन्सनी तो शेअर केला आहे. मुख्य म्हणजे महिलांचा आदर करण्याचा महत्त्वाचा संदेश देणारा हा व्हिडिओ शेअर करताना अनेकजण त्यासोबतच काही कॅप्शनही देत आहेत. या कॅप्शनमध्ये महिलांचा आदर करण्याचा मुद्दा उचलून धरला जातोय.
युट्यूबवरही काही युजर्सनी या दृश्याचे काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. अभिनेत्री अनुष्का शेट्टी, प्रभास, राणा डग्गुबती यांच्या अभिनयाची झलकही यातून पाहायला मिळत आहे. या दृश्यात दाखवल्याप्रमाणे, शिवालयात प्रवेश करत असतानाच सेतुपती महिलांकडे अश्लील नजरेने पाहात त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असतो. त्यानंतर त्याचा डोळा देवसेनेवर असतो. तो नराधम सेतुपती आपल्याला स्पर्श करणार इतक्यातच देवसेना मोठ्या धाडसाने आणि चतुराईने त्याच्या कमरेला बांधलेल्या एका हत्याराने त्याचीच बोटं कापते. तिच्या या कृत्यामुळे भल्लालदेवचे सैनिक तिला बंदी करुन, हातात साखळदंड घालून राजदरबारात आणतात. जिथे भल्लालदेव तिला शिक्षा देणार असतो. पण, तितक्यातच अमरेंद्र बाहुबली राजदरबारात येतो. त्याच्या येण्यामुळे सर्वांच्याच नजरा त्याच्यावर खिळतात. दरबारात आल्यानंतर तो देवसेनेला सर्व हकिगत विचारतो. देवसेना त्याला संपूर्ण हकिगत सांगते, त्यानंतर ‘देवसेना हे तू चुकीचे केलंस…’ असं अमरेंद्र बाहुबली म्हणतो पण, त्याच्या या वक्तव्यापुढे तो काही न बोलता तो थेट सेतुपतीचा शिरच्छेद करतो आणि संपूर्ण राजदरबारात शांतता पसरते.
‘औरत पर हात डालनेवाले की उंगलिया नही काटते…. काटके है उसका गला….’, असं म्हणत तळपायाची आग मस्तकात गेलेला बाहुबली जेव्हा सेतुपती या पात्राचा शिरच्छेद करतो तेव्हा चित्रपटगृहातही प्रेक्षक एकच कल्ला करतात. इतक्या प्रभावीपणे राजामौलींनी हा सुरेख संदेश पोहोचवल्याबद्दल अनेकांनी या दृश्याची प्रशंसा केली आहे. त्याशिवाय महिलांकडे वाइट नजरेने पाहणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर आल्यावर देत आहेत.