दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अनेकांना आता ‘कट्टप्पाने बाहुबली को क्यो मारा?’ या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची एवढी हवा होती की विचारायची सोय नाही. सिनेमाचं वेड आणि सिनेमावेडे प्रेक्षक नक्की काय असतात ते गेल्या काही दिवसांत लोकांना पाहायला मिळालं असेल. कोणी सकाळी सात वाजल्यापासून तिकिटांसाठी तीन तीन किलोमीटर लांब रांग लावली होती. तर कोणी चार हजार रुपये मोजून तिकिट विकत घेतले होते. तर कोणी प्रभासच्या मोठ्या पोस्टरला दुग्धाभिषेक घातला होता. मोठ्या पडद्यावर सुपर डुपर हिट ठरलेला बाहुबली आता फॅशन विश्वातही हिट ठरला आहे.
हा चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडाही उलटत नाही तोच याच चित्रपटाच्या साड्याही मार्केटमध्ये दाखल झाल्या. महिल्यांच्या साड्यांवर अमरेंद्र बाहुबली, देवसेना यांच्या प्रिंट पाहायला मिळत आहेत. बाहुबली सिनेमांचे पोस्टर असलेल्या साड्या महिला वर्गात इतक्या प्रसिद्ध झाल्या की अनेकींनी तर त्याच नेसून हा चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली. विशेषकरून दक्षिणेकडे या साड्यांना खूपच मागणी होती. एका तेलगू लेखिकेनेही आपल्या मैत्रिणींसाठी बाहुबली प्रिंटच्या या साड्या खास खरेदी केल्या होत्या. अभिनेत्री रवीना टंडनने ते फोटो शेअर केले. तेव्हा बाहुबलीची ही क्रेझ पुढचे काही दिवस अशीच पाहायला मिळणार आहे. हैदराबादमध्ये तर हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांनी सकाळी सात वाजल्यापासून तिकिटासाठी लांबलचक रांग लावली होती. तर चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी आंध्रप्रदेशमधल्या काही फॅन्सने आतषबाजी करत प्रभासच्या मोठ्या पोस्टरवर दुग्धाभिषेक केला.
दक्षिणेकडील प्रेक्षकांचे अशा प्रकारचे सिनेमावेड काही नवे नाही, गेल्यावर्षी सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘ कबाली’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी देखील अशीच क्रेझ पाहायला मिळाली होती. त्यावेळी देखील रजनीकांतच्या प्रिंट असलेल्या साडींचा ट्रेंड पाहायला मिळाला होता.
#Baahubali2mania pic.twitter.com/gktu1F0ynT— Raveena Tandon (@TandonRaveena) April 30, 2017