खरतर चहा आणि बिस्किटची जोडी सर्वांच्या पसंतीची. हो ना? सकाळी, संध्याकाळी अगदी इच्छा झाली की रात्री १२ वाजता देखील चहा बनवून त्यात बिस्किट बुडवून खाणारे आपल्यापैकी प्रत्येकाच्या ओळखीत असतील. काही चहाप्रेमी बिस्कीटांबाबत ब्रॅण्ड लॉयल असतात तर काही नेहमी बाजारात वेगवेगळ्या बिस्किटांच्या शोधात असतात. अशाच नव्या बिस्कीटांच्या शोधत असणाऱ्यांसाठी एक नवीन पर्याय बाजारात आला असून हा पर्याय थेट शेजराच्या बांगलादेशमधून आलाय हे विशेष. सध्या आपल्या देशात बांग्लादेशमध्ये तयार केलेल्या बिस्किटांचा खप वाढल्याचं दिसतंय. चवीला तिखट व चिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या या बिस्किटाच्या ब्रॅण्डचे नाव पोटाटा (Potata ) असे आहे. या बिस्किटाची लोकप्रियता पाहता भारतीय बाजारपेठत वर्षानुवर्ष तग धरून असलेल्या ब्रिटानिया, सनफिस्ट सारख्या ब्रॅण्डला याचा नक्कीच फटका बसणार अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

बांग्लादेशमधील प्राण (Pran) फुड्स या कंपनीची निर्मिती असणाऱ्या ‘पोटाटा’ बिस्कटाची पॅकिंग आकर्षक आहे. नावाप्रमाणे बटाट्यापासून हे बिस्किट तयार करण्यात आले आहे. प्राण कंपनीच्या संचालकाचे नाव अहसान खान चौधरी असून त्यांनी एका मुलाखती दरम्यान दिलेल्या माहितीनुसार या बिस्कीटाची संकल्पना चीनकडून मिळालीय.  एकदा चीन दौऱ्यावर गेले असताना प्रवासादरम्यान अहसान यांनी बटाट्यापासून बनवलेले आणि अगदीच वेगळ्या चवीचे एक बिस्किट चाखले होते. बांग्लादेशमध्ये परतल्यानंतर त्यांनी याच चवीचे बिस्किट बनविण्याचे ठरविलं आणि त्यातूनच ‘पोटाटा’ बिस्किटचा जन्म झाला. काही वर्षांपासून पश्चिम बंगाल व उत्तर भारतात प्राण कंपनीच्या इतर प्रोडक्टची विक्री होत आहे. मात्र, ‘पोटाटा’ असं प्रोडक्ट आहे की, जे देशाच्या वेगवेगळ्या भागात पसंत केलं जातंय.

मुलाखतीदरम्यान, चौधरी यांना बांग्लादेशचे तुम्ही रिलायंस आहात का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर चौधरी यांनी उत्तर देत मी ‘रिलायंस’ एवढा मोठा नसल्याचं म्हटलं होतं. भारतातल्या ७०० गावांपर्यंत पोहचण्याचा मानसही त्यांनी या दरम्यान व्यक्त केला होता. सध्या सोशल मीडियावर हे बिस्किट ट्रेंड करत आहे. अनेकांनी या बिस्किटबाबत ट्विट देखील केले आहे. तांत्रिक दृष्ट्या पोटाट हे एक बिस्कीट कम स्नॅक्स आहे, असंही अनेकांनी म्हटलंय.