गाझियाबादमधल्या एका बँक व्यवस्थापकाने आपल्या खातेदाराला अंत्यसंस्कारासाठी स्वत:च्या खिशातून ७ हजार रुपये काढून दिले. इतकेच नाही तर इतर ग्राहकांना विनंती करून त्यांनी उर्वरित पैशांची सोय देखील केली. या बँक व्यवस्थापकाचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

वाचा : …जेव्हा अभिनेत्यासोबत एटीएमच्या रांगेत डुक्कर उभे राहते

गाझियाबादमधल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बँक व्यवस्थापक म्हणून काम करणा-या अनिल कुमार जैन यांनी एका ग्राहकाला ७ हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. गाझियाबादमध्ये राहणारे मुन्ना लाल शर्मा यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यांची नात नेहा शर्मा ही त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे काढण्याकरता बँकेत गेली होती. परंतु बँकेत शुक्रवारपासून पैसे न आल्याने ग्राहकांना रिकाम्या  हाताने परतावे लागले. नेहाने सारा प्रकार बँक व्यवस्थापक अनिल कुमार जैन यांना समजावून सांगितला. अशावेळी जैन यांनी माणुसकी दाखवत नेहाला आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी ७ हजार रुपये देऊ केले. तसेच इतर कर्मचा-यांना तिला मदत करण्याची विनंती देखील त्यांनी केली. अनिल यांनी नेहासाठी १७ हजार रुपयांची मदत देऊ केली.

नेहा आजोबांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी बँकेत आली होती. आजोबांच्या औषधांसाठी तिला पैसे हवे होते. परंतु पैसे नसल्याने तिला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले होते. त्यानंतर दुस-याच दिवशी तिच्या आजोबांचे निधन झाले. तर नोटाबंदीच्या निर्णयामुळे नोएडातील जे. जे. क्लस्टरसमोरील पदपथावर एका व्यक्तीला आपल्या पत्नीचे शव पदपथावर घेऊन बसण्याची वेळ आली. पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे त्यांच्याजवळ नव्हते. तसेच बँकमध्येही दोन दिवसात रोकड उपलब्ध नसल्याने त्यांना आपल्या पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता आले नाहीत. तेव्हा पोलिसांनी आणि एका समाजसेवकाने पाच हजार रुपयांची मदत गोळा करून त्यांच्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले होते.

नोटाबंदी: बेवफा प्रियकर सापडला बँकेच्या रांगेत