दर महिन्याला कपड्यांची खरेदी करणारे, एकदा घातलेले कपडे महिनोंमहिने न घालणारे, लाखोंचे कपडे विकत घेणारे जगात कितीतरी आहेत, पण आपल्या आजूबाजूला असेही लोक राहतात ज्यांच्याकडे कपडे घ्यायला पुरेसे पैसे नसतात. म्हणूनच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पोस्ट पाहून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. आपल्या छोट्याशा मुलीला घेऊन रस्त्यावर भीक मागणा-या भिकारी बाबाची ही गोष्ट. दोन वर्षांनंतर आपल्या मुलीसाठी त्याने नवा फ्रॉक विकत घेतला आणि हा नवा फ्रॉक घालून तिच्या चेह-यावर जो आनंद बापाला दिसला तो खरंच शब्दात मांडणही अशक्य होतं. त्यातलं थोडसं हे मनोगत.
” काल मी माझ्या मुलीसाठी फ्रॉक घेतला, पिवळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये माझी मुलगी किती गोड दिसत होती नाही का? तिचा बाप म्हणून मी तिला काहीच देऊ शकत नाही, गेल्या दोन वर्षात तिने स्वत:साठी कपडेही घेतले नव्हते. एकदा तुटपुंजे पैसे जमवून मी तिच्यासाठी फ्रॉक घ्यायला गेलो होतो. तेव्हा मला दुकानातून बाहेर हाकललं होतं. माझ्यासोबत तिही होती, माझा झालेला अपमान पाहून यापुढे मला फ्रॉक नको असं तिने रडत रडत मला सांगितलं होतं. पण तिच्यासाठी काहीही न करू शकल्याचे दु:ख मला सलत होते. आज भीक मागून जमवलेली पैन् पै एकत्र करून मी तिच्यासाठी फ्रॉक घेतला. अपघातात मी एक हात गमावला, तेव्हा पासून ही मुलगी आपल्या हाताने माझी सेवा करत होती.
सकाळी उठल्यावर मी रोज भीक मागायला जातो. मी भीक मागतो हे तिला आवडत नाही. पण तरीही माझा हात पकडून ती भीक मागायला माझ्यासोबत येते. कारण तिला भिती वाटते की रस्त्यात एखाद्या गाडीने तिच्या अपंग बापाला ठोकलं तर… हताशपणे ती सिग्नलवर बसून असते केवळ आपल्या बाबांसाठी.”
जीएमबी आकाश या फेसबुक पेजवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली होती.