कार्तिक शुद्ध द्वितीयाच्या म्हणजे यमद्वितीयेला भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे. यंदाच्या दिवाळीत मंगळवारी यमद्वितीया असून या दिवशी भाऊ बहिणीकडे हक्काने जाऊन औक्षण केल्यावर तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्याने भावाचे आयुष्य वाढते असा देखील समज आहे. प्रत्येक बहिण आपल्या भावासाठी शुभ मुहूर्तावर औक्षण करत असते.

भाऊबीजेचे मुहूर्त पुढीलप्रमाणे

भाऊबीजसाठी सकाळी ०९.३० ते १०.५५ वाजेपर्यंत,
सकाळी १०:५५ ते दुपारी १२:२५ वाजेपर्यंत,
दुपारी १२:२५ ते ०१:४५ वाजेपर्यंत,
दुपारी २.५० ते.०४.२० आणि
संध्याकाळी ०७.१५ ते ८.३३ असे मुहूर्त आहेत.

भावाचे आयुष्य वाढविण्यासाठी यमराजला करा प्रार्थना

या दिवशी सगळ्यात आधी भाऊ-बहिण दोघांनी मिळून यम, चित्रगुप्त आणि यमदूतांची पूजा करण्याची परंपरा आहे. बहिण भावाच्या आयुष्य वृध्दीसाठी यमराजच्या प्रतिमेचे पूजनही करते. मार्कंण्डेय, हनुमान, बलि, परशुराम, व्यास, विभीषण, कृपाचार्य तसेच अश्वत्थामा या आठ चिरंजीवीयांप्रमाणेच आपल्या भावाला देखील चिरंजीवी करा अशी बहिण यमराजकडे प्रार्थना करते. यानंतर बहिण भावाला भोजन वाढते. भोजनानंतर बहिण भावाला टिळा लावते. यानंतर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केल्यानंतर या सर्व गोष्टींची परतफेड म्हणून सर्व ऋषी मुनींनी मोठा यज्ञ केला. या यज्ञामध्ये यमराजाने उडी घेतली. त्याने यज्ञात उडी घेतल्यानंतर यमाची बहिणी यमीने बंधू प्रेमापोटी या यज्ञात उडी घेतली. यम आणि यमी यांच्यातील प्रेमाच्या प्रतिकावरुन भाऊबीज साजरी केली जाते, अशी आख्यायिका आहे.