एकीकडे स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत खेड्यापाड्या शौचालय बांधण्याचं काम मोठ्या प्रमाणात सरकार करत आहे. गावातील लोकांमध्ये शौचालय, स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. प्रत्येक गाव हे हागणदारी मुक्त व्हावं लोकांनी स्वच्छेतेकडे आणि चांगल्या आरोग्याकडे विशेष भर द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण या मोहिमेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत एका गावाने घराघरात शौचालय बांधण्याच्या मोहिमेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचं कारण काय तर गावकऱ्यांच्या मनात ठासून भरलेली अंधश्रद्धा आणि भीती होय. शौचालय बांधणं अशुभ असून यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडतात अशी भीती या लोकांना आहे म्हणून शौचालय बांधण्यास ठाम नकार या गावकऱ्यांनी दिला आहे.

वाचा : ७६ वर्षांचे आजोबा, ७० वर्षांची आजी…३० वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर केलं लग्न

बिहारमधल्या नावाडा जिल्ह्यात गाझीपूर नावचं गाव आहे. या गावातील प्रत्येक कुटुंब शौचालय बांधणं अशुभ समजतात. शौचालय बांधण्याचा प्रयत्न करणारे कुटुंब दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकतात त्यांच्यासोबत वाईट घटना घडतात अशी भीती या लोकांच्या मनात घर करून आहे. तेव्हा या गावात कोणत्याही कुटुंबाने शौचालय बांधलं नाही. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार या गावात शौचालय बांधण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण याआधी मृत्युमूखी पडलेत. १९९६ मध्ये या गावात शौचालय बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरूणाचा मृत्यू झाला होता. काही वर्षांनी असाच एकाचा मृत्यू झाला. २००९ मध्ये शौचालय बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा अपघात झाला होता. तेव्हापासून शौचालय न बांधण्याचा निर्णय त्यांनी पक्का केलाय. गावातील लोकांच्या या अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याचा प्रयत्न इथल्या जिल्हाधिकारी करत आहे. अंधश्रद्धा आणि भीती दूर करून लोकांनी स्वच्छतेला अधिक महत्त्व द्यावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

वाचा : असे डॉक्टर दुर्मिळच; १०२ वर्षांचे असूनही सातही दिवस सेवा देतात तेही फक्त ३० रुपयांत