तुम्ही रस्त्यावरून जात असताना अचानक सापाने तुमच्यावर हल्ला केला आणि त्यातून तुम्ही थोडक्यात बचावलात तर तुमची काय अवस्था होईल. सहाजिकच तुम्ही घाबरून जाल आणि देवाचे आभार मानाल. थायलंडमधील एका दुचाकीस्वारासोबत असेच काहीसे घडले. या महिन्याच्या १७ तारखेला सोशल मीडिया वेबसाइट यू-ट्युबवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला. महामार्गावरून जात असलेल्या एका दुचाकीस्वारावर साप अचानक हल्ला करत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. जलद गतीने सळसळत महामार्ग ओलांडत असलेला साप आपल्या अंगावर ऊडी मारत असल्याचे दुचाकीस्वाराच्या लक्षात येताच दुचाकीस्वार पाय वर घेऊन सापाचा हल्ला चुकवतो. विशेष म्हणजे दुचाकीस्वार आणि साप दोघे अतिशय वेगात असल्याने ही सर्व घटना काही क्षणात घडते. दुचाकीस्वाराच्या पाठीमागून येत असलेल्या कारमधील व्यक्तीने शूट केलेला हा सर्व प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा व्हिडिओ थायलंडमधील असल्याचे सांगितले जाते. व्हिडिओ यू-ट्युबवर अपलोड होताच केवळ २४ तासांत चार लाखहून अधिक वेळा तो पाहायला गेला.
काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारची एक घटना थायलंडमधील चाय चॅन शहरात घडली होती. या घटनेत सापाने एका मुलाच्या पार्श्वभागाला दंश केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. ७० सेकंदाचा हा व्हिडिओ एखाद्या सायबर कॅफेमधील असल्याचे जाणवते. सायबर कॅफेमध्ये सहा-सात जण बसलेले असतात. त्यांच्यातील एक मुलगा मित्रांशी बोलताबोलता बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडतो. दरवाजा उघडताच साप त्याच्या पार्श्वभागाला दंश करतो आणि लटकून राहतो. सापाच्या अनपेक्षित हल्ल्यामुळे तो मुलगा गोंधळून जातो. सापापासून मुक्तता करण्यासाठी तो उड्या मारायला लागतो, नंतर जमिनीवर लोळण घेत स्वत:ची सापापासून मुक्तता करून घेतो.. काय घडतेय हे लक्षात न आल्याने उपस्थित गोंधळून जातात. परंतु, त्या मुलाची अवस्था पाहून ते देखील भयभीत होतात. नंतर सापाला पाहून ते देखील घाबरून इकडेतिकडे पळायला लागतात. हा सर्व प्रकार कॅफेत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.