नवी दिल्ली (विश्वास न्यूज): लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्याच्या आधी, निल्सन-दैनिक भास्कर (वृत्तपत्र) ने मतदानपूर्व मेगा सर्व्हे केल्याची माहिती देणारे फोटो ऑनलाईन व्हायरल होत आहेत. वृत्तपत्रांच्या या आवृत्त्यांमध्ये I.N.D.I. A युती येत्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, बंगाल, तामिळनाडू, तेलंगणासह १० राज्यांमध्ये भाजपाला पूर्णपणे हरवू शकते असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. विश्वास न्यूजने केलेल्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले पण या दाव्यासह व्हायरल होणाऱ्या वृत्तपत्राचा स्क्रीनशॉट नेमका काय सांगतो हे ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे, चला पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

सोशल मीडिया यूजर ‘Priyamwada’ ने व्हायरल पोस्ट शेयर करत लिहिले होते की, “अबकी बार भाजपा तडीपार, दैनिक भास्कर-नेल्सन सर्वेक्षण: 10 राज्यांमध्ये इंडिया आघाडी आघाडीवर आहे, या १० राज्यांमध्ये इंडिया आघाडी २०० चा आकडा पार करू शकेल. हिंदी हार्टलँड राज्यांमध्येही मोदींची प्रतिमा भाजपला मते मिळविण्यासाठी पुरेशी नाही. NDA चा बिहार, बंगाल आणि महाराष्ट्रातून धुव्वा उडवला जाईल .#BJPbelow180″

वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अनेक वापरकर्त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

तपास:

व्हायरल पोस्टमध्ये केलेल्या दाव्याची पुष्टी करणारी बातमी आम्हाला दैनिक भास्करच्या वेबसाइटवर किंवा सोशल मीडिया हँडलवर आढळली नाही. अन्य बातम्यांमध्येही कोणत्याही मेगा सर्वेक्षणाच्या डेटाचा उल्लेख नाही. मात्र आम्हाला १३ एप्रिल २०२४ रोजीच्या दैनिक भास्करच्या अधिकृत X हँडलवर शेअर केलेली एक पोस्ट आढळली, ज्यामध्ये हे सर्वेक्षण बनावट असल्याचे सांगण्यात आले होते.

हे बनावट सर्वेक्षण शेअर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. व्हायरल पोस्टमध्ये दैनिक भास्कर वृत्तपत्राच्या पहिल्या पानाचा स्क्रीनशॉट आहे, ज्यामध्ये भोपाळ आवृत्ती आणि 13 एप्रिलची तारीख नमूद आहे. आम्ही संबंधित तारखेची भोपाळ आवृत्ती तपासली आणि असे आढळले की त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात असे कोणतेही सर्वेक्षण प्रकाशित झाले नव्हते, उलट पहिली बातमी पावसाशी संबंधित होती.

व्हायरल स्क्रीनशॉटबाबत आम्ही दैनिक भास्करचे राष्ट्रीय संपादक एलपी पंत यांना संपर्क केला. त्यांनी पुष्टी केली की हे खोटे सर्वेक्षण आहे आणि भास्करने असे कोणतेही सर्वेक्षण प्रकाशित केलेले नाही. फेक सर्व्हे शेअर करणाऱ्या युजरला फेसबुकवर ३५ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.

निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, एकूण सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी सुरू होईल, ज्या अंतर्गत एकूण १०२ जागांवर मतदान होणार आहे.

निष्कर्ष: पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी निल्सन-भास्करच्या नावाने व्हायरल होत असलेले निवडणूकपूर्व सर्वेक्षण खोटे असून, त्यात विरोधी आघाडी १० राज्यांमध्ये आघाडीवर असल्याचा केलेला दावा सुद्धा खोटा आहे.

(ही कथा मूळतः विश्वास न्यूजने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता पुनर्प्रकाशित केली आहे.)

अनुवाद- अंकिता देशकर