Video : दोन वर्षांच्या मुलीने पहिल्यांदा आईला बघितले; आईची प्रतिक्रिया बघून व्हाल भावूक

आई आणि बाळाचे नाते उलगडणारा क्षण

मूल आणि आईचे नाते याबद्दल शब्दात सांगणे तसे कठिणच. या दोन जीवांचे नाते इतके अतूट असते की त्याची दुसऱ्या कोणत्याही नात्याशी तुलनाच करता येणार नाही. बाळाला ९ महिने आपल्या पोटात वाढवणे आणि अखेर त्याला जन्म देणे ही प्रक्रिया कोणत्याही आईसाठी कायमच खास असते. बाळाच्या जन्मानंतर सुरु होणाऱ्या आई आणि बाळाच्या प्रवासातील प्रत्येक टप्पा आईसाठी खास असतो. आपले बाळ आपल्याविना राहू शकत नाही ही संकल्पनाही तिच्यासाठी खूप सुखावून टाकणारी असते. मग त्याने धरलेला आपला हात असो किंवा त्याने आपल्याकडे पाहून दिलेली छानशी स्माईल असो. यातील प्रत्येक गोष्ट कायमच आईला सुखावणारी असते.

मात्र जन्मापासून आपली मुलगी पाहू शकत नाही या गोष्टीचे दु:ख डायना हिला सहन करावे लागत होते. निकोली या तिच्या मुलीला एका असाध्य आजारामुळे जन्मापासून दिसत नव्हते. परंतु ती २ वर्षांची झाल्यावर तिच्या डोळ्यांवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया जवळपास तीन तास सुरु होती. यानंतर तरी आपल्या चिमुकलीला दिसू शकेल का अशी चिंता तिच्या कुटुंबियांमध्ये होती. मात्र या शस्त्रक्रियेमुळे अखेर या निकोलीला दिसायला लागले. एखाद्या बाहुलीसारखी दिसणारी गोबऱ्या गालांची निकोली आता या जगातील गोष्टी पाहू शकणार आहे याचा आनंद तिच्या आईसाठी इतर कोणत्याही आनंदाच्या पलिकडे होता.

निकोलीने मला पहिल्यांदा पाहिले तो क्षण माझ्यासाठी खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाचा क्षण होता, असे डायनाने म्हटले आहे. आपली मुलगी पाहू शकते हे समजल्यावर या लहानगीच्या आईला इतका आनंद झाला की तिच्या भावननांचा बांध फुटला. डायनाने आपल्या भावनांना फेसबुकच्या पेजवरुन वाट मोकळी करुन दिली. तिने शेअर कलेल्या पोस्टला फेसबुकवर असंख्य प्रतिक्रीया मिळाल्या असून आईसाठी आपल्या मुलाची प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असणे किती आनंद देणारे असते हेच या घटनेतून दिसून येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Blind girl sees her mom for first time