गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या बॉइज लॉकर रुम प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. एका मुलीने चक्क मुलगा असल्याचे भासवण्यासाठी स्नॅपचॅटवर सिद्धार्थ या नावाने बनावट खाते उघडले. आणि वर्गातील एका मुलाला तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याबाबत विचारणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समोरील मुलाने अशाप्रकारच्या लैंगिक आत्याचारास नकार देत संवाद बंद केला. स्नॅपचॅटवरील #BoisLocker-Room चॅटच्या तपासणीनंतर हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि बनावट खाते उघडणारी मुलगी एकाच परिसरात राहतात. त्या मुलीला मुलाचे चारित्र्य कसे आहे हे आजमावायचे होते त्यामुळे मुलीने स्नॅपचॅटवर सिद्धार्थ नावाने बनावट खाते उघडले. यावेळी तिने सिद्धार्थ होऊन स्वत:वर लैंगिक अत्याचार करण्याची योजना आखण्याबाबत त्या मुलाशी बोलत असे. आपल्यावर अत्याचार करण्याबाबत तो काय प्रतिक्रिया देतो. हेच तिला आजमावायचे होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.
(आणखी वाचा : Bois Locker Room: इन्स्टाग्रामवरील ग्रुप अॅडमिनला पोलिसांकडून अटक )
दरम्यान, व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमधील संवाद #BoisLocker-Room चे सदस्य असलेल्या दोन मुलांमध्ये असल्याचा खुलासा सुरूवातीला झाला होता. पोलिसांनी त्यासंदर्भात आधिक तपास केला. यामधील एकूण २७ मुलांपैकी ज्यांची ओळख पटलेली आहे, अशांनी या संवाद साधलेला नसल्याचे पोलिसांच्या तपासत स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आणखी खोलात जाऊन तपास केला. या मुलीने लैंगिक अत्याचाराबाबत मुलाशी चर्चा केल्यानंतर मुलाने आपल्या संवादाचे स्क्रीन शॉट काढले आणि ते आपल्या मित्रांना पाठवले. त्यानंतर त्याच्या मित्रांपैकी एकाने हा संवाद इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यानंतर हा संवाद व्हायरल झाला.
यापूर्वी पोलिसांनी इन्स्टाग्रामकडून या ग्रुपमधील सर्व सदस्यांबद्दल माहिती मागवली आहे. “या ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांची ओळख पटवली जात आहे. या ग्रुपमधील अल्पवयीन सदस्यांवर ज्युविनाईल जस्टिस अॅक्टमधील तरतुदीनुसार कारवाई केली जात आहे, ”असे दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.