कंटाळा येणं ही तशी सामान्य बाब आहे. मात्र असाच कंटाळा येणं एका व्यक्तीला फारच महागात पडलंय. विशेष म्हणजे ही व्यक्ती एक सुरक्षारक्षक असून ज्या कलाकृतीची सुरक्षा या व्यक्तीने करणं अपेक्षित होतं तीच कलाकृती त्याने कंटाळा घालवण्यासाठी खराब केलीय. आश्चर्याची गोष्टमध्ये जी कलाकृती या सर्व प्रकरणामध्ये खराब झालीय तिची किंमत १ मिलीयन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनामध्ये ७ कोटी ४७ लाख रुपये इतकी आहे. कामावर रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या सुरक्षारक्षकाने हा उद्योग केल्याची माहिती समोर येतेय.

पश्चिम-मध्य रशियामधील स्वेर्डलोव्हस्क ओब्लास्ट प्रांतामधील येल्टसीन सेंटरमध्ये हा सारा प्रकार घडलाय. या सुरक्षारक्षकाने खराब केलेल्या कलाकृतीचं नाव ‘थ्री फिंगर्स’ असं आहे. ही कलाकृती १९३२ ते १९३४ या कालावधीमधील आहे. अ‍ॅना लेपोरस्काया यांच्या शोमधील ट्रेटयाकोव्ह गॅलरीमधील हे चित्र आहे. या चित्रामधील तीन व्यक्तींच्या चेहऱ्यांपैकी दोन चेहऱ्यांवर सुरक्षारक्षकाने बॉल पेनने डोळे काढल्याचा दावा करण्यात आल्याचं मेट्रो या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात करण्यात आलाय.

खासगी सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या या सुरक्षारक्षकाच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नसला तरी त्याचं वय ६० वर्ष असल्याची माहिती समोर आलीय. या व्यक्तीला कामावरुन काढून टाकण्यात आलंय. डिसेंबर महिन्यामध्ये सात तारखेला आयोजित करण्यात आलेल्या ‘द वर्ल्ड अ‍ॅज नॉन-ऑब्जेक्टिव्हिटी, द बर्थ ऑफ अ न्यू आर्ट’ या प्रदर्शनात हे चित्र ठेवण्यात आलं होतं. याच ठिकाणी हा सारा धक्कादायक प्रकार घडलाय.

नक्की वाचा >> कंटाळलेल्या सुरक्षारक्षकाने ७ कोटींच्या चित्रावर बॉल पेनने डोळे काढल्याचं वाचून महिंद्रा म्हणतात, “चिंता कशाला…”

The painting before the security guard took to it with his pen. Credit: Newsflash

या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केला असून कालकृती खराब करण्याच्या दाव्याअंतर्गत तपास सुरु आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्याला ३९ हजार ९०० रुपये दंड आणि एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या कलाकृतीला झालेलं नुकसान हे २ लाख ४९ हजार ५०० रुपयांचं असल्याचं सांगण्यात येत आहे.

And after... Credit: Newsflash

या चित्राची नेमकी किंमत ठाऊक नसली तर अल्फा नावाच्या विमा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या चित्राचा विमा ७ कोटी ४७ लाखांचा आहे. आता ही कंपनीच या चित्राची डागडुजी करण्याचा खर्च करणार आहे. या चित्राला पूर्वप्रमाणे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी तज्ज्ञांचा एक गट काम करत आहे.