लग्नासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच नवरीमुलगी अपघाताने घराच्या छतावरुन खाली कोसळली. नवरीमुलीच्या पाठीला आणि पायांना गंभीर दुखापत झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अक्षता डोक्यावर पडण्यासाठी काहीच वेळ शिल्लक असताना ही घटना घडल्याने सर्वांनाच आता पुढं काय अशी चिंता सतावू लागली. पण नवरदेवाने असं काही केलं की सर्वांना सुटकेचा निश्वास सोडला.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात हा प्रकार घडला. रुग्णालयाच्या बेडवरुन हलताही येत नसताना तिच्यासोबतच लग्न करायचं असा निर्धार नवऱ्यामुलाने केला. अखेर दोघांनीही काही झालं तरी लग्न रद्द करायचं नाही असा निर्णय घेतला. रुग्णालयातच विवाह करायचा असं त्यांनी ठरवलं. विशेष म्हणजे रुग्णालयानेही रुग्णालय परिसरात लग्नविधी करण्यासाठी परवानगी देण्यात आली.

नवरामुलगा अवदेश याने म्हटलं आहे की, “जे झालं तो नशीबाचा भाग आहे. पण मी तिच्यासोबत राहण्याचा आणि संकटात तिला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे”. “सुरुवातीला मला थोडी भीती वाटली. पण नंतर माझ्या पतीने मी जरी बरी झाली नाही तरी सोबत असेन असं सांगितलं. ते ऐकून मला प्रचंड आनंद झाला,” अशी भावना नवरीमुलगी आरतीने व्यक्त केली आहे.

“महिला अपघाताने छतावरुन खाली पडल्याने तिच्या पाठीला दुखापत झाली आहे. तिला पाय हलवणंही शक्य होत नाही. तिचं लग्न होणार होतं त्यामुळे आम्हीदेखील त्यासाठी परवानगी दिली. पण तिला पायाची हालचाल करण्यास मनाई आहे,” अशी माहिती डॉक्टर सचिन सिंग यांनी दिली आहे. “नवरीमुलीला बेडवरुन हालताही येत नसताना दोघे लग्न करतायत हे चित्र खूपच सुंदर आहे,” अशी भावना डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.