लग्नसमारंभ म्हणजे दोन्ही कुटुंबांसाठी एक आनंदाचा सोहळा. वधुवरांच्या आईवडिलांसाठी हा आनंदाचा क्षण असतोच पण नातेवाईक आणि मित्रमंडळींसमोर त्यांची ‘इज्जत दाँव पे’ वगैरे असते असं त्यांना वाटतं. आपल्या मुलांच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तितक्याच भपकेबाजपणे व्हावा यासाठी सगळे, सगळे प्रयत्न केले जातात.

आणि मग उजाडतो तो लग्नाचा दिवस. सगळं निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून घरच्यांची धावपळ सुरू असते. सगळ्यांचं छान आदरातिथ्य केलं जातं. पण सगळ्यात टेन्शन असतं ते वधुवरांना. ‘हे माझ्या आईच्या बहिणीच्या मोठ्या साडूंचे जे काका आहेत त्यांच्या मामांचे चुलतभाऊ’, ‘घरी यायचंच हं’ वगैरे बोलत सगळ्यांचा मान राखला जातोय की नाही हे पाहणं म्हणजे डोकेदुखी. पण आता हे सगळं सांभाळत आपल्याच लग्नसोहळ्यात हे नवरा-नवरी धमालही करताना दिसतात.

असाच एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय. आपल्याच लग्नाच्या मांडवात एक संपूर्णपणे सजलेली नवरी मस्त डान्स करतेय. एकतर नवरीची साडी आणि दागिने जाम जड असतात. पण त्यातही ही नवरी आपला लग्नसोहळा मस्त एंजाॅय करतेय.

सौजन्य- यूट्यूब

आणि मजा म्हणजे हा व्हिडिओ कॅनडा, आॅस्ट्रेलिया आणि फिलिपाईन्समध्ये ‘ट्रेंड’ होतोय. आपल्याला आश्चर्य वाटेल पण आपल्या भारतीय लग्नांमध्ये आपण जे नाचतो त्या स्टेप्स परदेशी लोकांना जाम कठीण वाटतात. मग ते लग्नात आपलं वजन कमी होणार असल्याच्या थाटात वेडेवाकडे नाचणारे काका असोत की बाॅलिवूड डान्स करणाऱ्या आपल्या बहिणी असोत. हा डान्स परदेशी नागरिकांना काही केल्या जमत नाही. म्हणून हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय का?

वाचा- पठ्ठ्याने समुद्राखाली केलं लग्न!

लग्नातला डान्स किती कठीण असतो याचं आपल्यासमोरचं फेमस उदाहरण म्हणजे ‘लव्ह आज कल’. सैफ अली खान आणि दीपिका पदुकोनच्या या सिनेमात एका ब्राझिलियन अभिनेत्रीनेही काम केलं होतं. जिसेल माँटेरो या ब्राझिलियन अभिनेत्रीच्या कामाचं कौतुक झालं होतं. तिने एका गाण्यात केलेल्या डान्सबाबतही तिची प्रशंसा झाली होती.

सौजन्य- यूट्यूब

हे गाणं सिनेमात छान दिसत असलं तरी या गाण्याच्या शूटिंगच्यावेळी जिसेल माँटेरोला टिपिकल भारतीय स्टेप्स बिलकुल जमत नव्हत्या. आपण सगळेजण जे ठुमके देतो ते खरंतर जाम कठीण असतात. बऱ्याच प्रयत्नांनी या स्टेप्स जिसेल ला जमल्या आणि हे गाणं शूट झालं.

आपल्या लग्नांमधला डान्स काय ग्रेट वगैरे नाही. पण फॅमिली फंक्शनच्या आनंदात सामील होत सगळेजण मजा करतात. पण हे भयानक ठुमके नंतर मात्र जन्मभर लग्नाच्या व्हिडिओमध्ये दिसत राहतात आणि या ‘डान्सर्स’ची खेचायचा सगळ्यांना चान्स मिळत राहतो.