नोटाबंदीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून बाद झाल्या. पण त्यानंतर अनेक ठिकाणी मंदिरातील दानपेटीमध्ये भक्तांनी दान म्हणून ५०० आणि १००० च्या नोटा टाकण्यास सुरुवात केली. यावर शक्कल लढवत रायपुरमधल्या एका मंदिराने चक्क दानपेटीऐवजी कार्ड स्वाईप मशीन्स ठेवली आहे.

VIDEO : नोटाबंदीच्या समर्थनार्थ ७ वर्षांच्या मुलीने लिहिले मोदींना पत्र

नोटाबंदीनंतर अनेक भक्तांनी मोठ मोठ्या मंदिरात ५०० आणि १००० च्या नोटा दान म्हणून टाकल्या. अशा अनेक बातम्या गेल्या आठवड्याभरापासून चर्चेत होत्या. यावर उपाय म्हणून छत्तीसगढमधल्या रायपुर येथील मंदिराने दानपेटीच्या शेजारी स्वाईप मशीन ठेवली आहे. येथील बंजारा मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविक या मंदिराला देणगी आणि दानही मोठ्या प्रमाणत देतात. पण, नोटाबंदीच्या निर्णयानंतर देणग्यांची रक्कम कमी झाली किंवा दानपेटीमध्ये जून्या नोटांचे दान भाविकांकडून येत आहे. म्हणूनच, देगणी देण्यासाठी या मंदिराने दानपेटीबाहेर स्वाइप मशीन ठेवली आहे. त्यामुळे आता कार्ड स्वाईप करून भाविक देगण्या देऊ शकतात.

तर दुसरीकडे नोटाबंदीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर काही दिवसांनी गुवाहटीमधल्या कामख्या देवी मंदिराबाहेरची दानपेटीही हटवण्यात आली. काळा पैसा लपवण्यासाठी भ्रष्टाचारी काळ धन दानपेटीत टाकत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या लक्षात आले. तसेच काही दिवसांत देशात इतर मंदिरांप्रमाणे या मंदिराच्या दानपेटीत १००० आणि ५०० च्या जून्या नोटा येऊ लागल्या होत्या. त्यामुळे, दानपेटीच हटवण्याचा निर्णय घेतला होता.