नोएडामधील जुळ्या बहिणी मानसी आणि मान्या या फक्त एकसारख्या दिसतच नाहीत तर त्यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या सीबीएसई बारावीच्या परीक्षेत गुणही अगदी सारखेच मिळवलेत. दोघींना ९५.८ टक्के गुण मिळाले आहेत, पण थक्क करणारी बाब म्हणजे दोघींना सर्व विषयांतही सारखेच गुण मिळालेत.

ग्रेटर नोएडातील एस्टर पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या मानसी आणि मान्या या जुळ्या बहिणींना इंग्रजी आणि कंम्प्युटर सायन्समध्ये ९८-९८ गुण मिळाले आहेत. तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि फिजिकल एज्युकेशनमध्ये प्रत्येकी ९५-९५ गुण मिळालेत. याबाबत बोलताना, “मी दोन वर्षांपूर्वी सारख्या दिसणाऱ्या जुळ्या बहिणींनी सारखेच गुण मिळवल्याचं वाचलं होतं. पण तो खूप जास्त योगायोग असेल असा मी विचार केला होता. पण आता आम्हा दोघींनाही सारखेच गुण मिळालेत याचा विश्वासच बसत नाहीये”, असं मान्या म्हणाली. आम्हा दोघींमध्ये नेहमीच स्पर्धा असते पण यापूर्वी कधीही आम्हाला सारखेच गुण मिळाले नव्हते, असंही मान्याने सांगितलं. तर, “आम्ही सारख्या दिसतो त्यामुळे सगळेच आम्हाला ओळखतात. आम्हा दोघींचं नाव वेगवेगळं आहे, तेवढाच आम्हा दोघींमधला फरक आहे. परीक्षेत चांगली कामगिरी करु असा दोघींनाही विश्वास होता, पण अगदी सारखेच गुण मिळतील असा कधी विचारही केला नव्हता”, अशी प्रतिक्रिया मानसीने दिली.

मानसी आणि मान्या यांच्या जन्मामधील नऊ मिनिटांचा फरक(३, मार्च २००३) वगळता जवळपास सर्वच बाबी सारख्या आहेत. आता या दोघी बहिणी इंजिनिअरिंगची पुढील तयारी करत आहेत. जेईई परीक्षेसाठी दोघींनी तयारी सुरु केली आहे. पण करोना व्हायरसमुळे ही परीक्षा सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.