तमिळनाडूतील कुन्नूरनजीक भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. बिपिन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सर्वसामान्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत प्रत्येकजण शोक व्यक्त करत आहे. यादरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गुणरत्न सदावर्ते कोणाचं निधन झालं आहे असं विचारताना दिसत आहेत.

व्हिडीओत काय आहे –

व्हिडीओमध्ये गुणरत्न सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलण्याआधी मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला त्यांचं पूर्ण नाव काय होतं? अशी विचारणा करतात. यावर त्यांनी बिपिन रावत सांगितलं असता ते कोण होते? अशी विचारणाही ते करतात. यानंतर तिथे उपस्थित त्यांनी तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख होते आणि त्यांच्या पत्नीही सोबत होत्या अशी माहिती देतात.

यानंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा बिपिन रावत हे नाव बरोबर आहे ना अशी खातरजमा करतात. यावर तिथे उपस्थित पुन्हा एकदा त्यांना सांगतात.

गुणरत्न सदावर्ते यांचा सर्व संवाद रेकॉर्ड झाला असून घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गुणरत्न सदावर्ते आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले असून तिथे त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.