China Bridge Collapse Shocking Video : पावसाळ्यात रस्त्यावरून वाहनं सावकाश चालवा, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र, अनेकदा वाहन कितीही सांभाळून चालवलं तरी अपघात घडायचा तो घडतोच. अशाच एका धडकी भरवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक ट्रक तुटलेल्या पुलावर जाऊन ज्या प्रकारे अडकला आहे, ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. थरारक अपघाताची ही घटना चीनच्या दक्षिण पश्चिमेकडील गुइझोउ प्रांतात घडली आहे.
चीनमध्ये सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडतायत. अशात चीनच्या हौजिहे पुलाजवळ भूस्खलनाची ही घटना घडली, ज्यात या पुलाचा एक भाग अचानक कोसळला. हा पूल श्यामेन–चेंगडू महामार्गाचा (Xiamen–Chengdu Expressway) भाग होता. दरम्यान, पूल कोसळला त्यावेळी एक भलमोठा मालवाहू ट्रक तिथून जात होता. त्यामुळे हा ट्रकही खाली कोसळणारच होता; पण नशीब बलवत्तर म्हणून पूर्ण ट्रक दरीत न कोसळता, तो पुलाच्या तुटलेल्या भागावर लटकत राहिला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
त्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने ट्रकचालकाला तत्काळ सुखरूप बाहेर काढलं. पण, अपघातादरम्यान नेमकी काय परिस्थिती होती त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
दरम्यान, अपघातग्रस्त ट्रकचालकाचे नाव यो गुओचुन (You Guochun) असे असून, त्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अपघाताचा थरारक अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला की, पुलावरून ट्रक चालवतानाच काहीतरी गडबड असल्याचे जाणवले होते. त्यामुळे मी शक्य तितक्या वेगाने पूल पार करण्याच्या प्रयत्नात होतो आणि तेवढ्यात जमिनीखालून काहीतरी हालचाल जाणवू लागली. त्यानंतर पुलासह ट्रकही खाली कोसळणार होता; पण सुदैवाने मी ब्रेक दाबल्याने ट्रक पुढे गेला नाही आणि तो अर्धवट पुलावरच लटकत राहिला. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत ट्रकच्या छतावर शिडी लावून मला बाहेर काढले. या घटनेच्या वेळी मी खूप घाबरलो होतो. सगळं संपलं, असे विचार मनात येत होते; पण अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमुळे माझे प्राण वाचले.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. जो पाहून एका युजरने लिहिले, “हे खूप भयानक आहे. निसर्गाच्या शक्तीला कधीही हलक्यात घेऊ नये.”