केवळ आईसाठी गेल्या वीस वर्षांपासून महिलांसारखे कपडे घालून एक चीनी व्यक्ती वावरत आहे. त्याचा व्हिडिओ चीनच्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण दुसरीकडे आईसाठी एवढं मोठं पाऊल उचलणाऱ्या या व्यक्तीचं भरभरून कौतुकही केलं जातंय. या व्यक्तीचं नाव गुपित ठेवण्यात आलंय. २० वर्षांपूर्वी त्याच्या बहिणीचं निधन झालं. आपल्या लाडक्या मुलीला गमवल्याचं दु:ख त्याच्या आईला सारखं बोचत होतं. पोटची पोरगी गमावल्यानंतर त्याच्या आईचं मानसिक संतुलन ढासळू लागलं. आईची तब्येत वारंवार बिघडू लागली. तेव्हा आईला थोडं बरं वाटावं म्हणून तो आपल्या बहिणीसारखे कपडे परिधान करून आणि तसाच तयार होऊन आईसमोर आला. त्याला पाहताच मुलगी आल्यासारखंच आईला वाटू लागलं. आईची तब्येत सुधारू लागली. तेव्हापासून त्याने आपल्या बहिणासारखंच राहायचं ठरवलं.
…म्हणून ‘विनी द पू’ वर चीनमध्ये कायमची बंदी
मुलीच्या वेशात आईजवळ राहिलं की तिला आपली मुलगी परत आल्याचं समाधान वाटतं. त्या काळात ती खूष असते म्हणून आईसाठी त्याने कायम महिलांसारखा वेश परिधान करून राहण्याचं ठरवलं. त्याचं असं राहणीमान बघून अनेकदा आजूबाजूचे लोक त्याला चिडवतात पण लोकांच्या टोमण्यापेक्षा मला आई जास्त महत्त्वाची वाटते असं तो म्हणतो. या कपड्यांची त्याला एवढी सवय झालीय की आता आपल्याकडे पुरुषांचे कपडेच नाही असंही तो सांगतो. आईची काळजी घेण्यासाठी त्याने २० वर्षांपासून लग्नही केलं नाही.