company fired Chinese man after finds him walking 16000 steps on sick day leave : सुट्टी मिळवण्यासाठी अनेक लोक कंपनीमध्ये तब्येत खराब असल्याचे खोटे कारण सर्रास सांगतात. पण चीनमध्ये एका व्यक्तीला असे करणे चांगलेच महागात पडले आहे. चीनमधील एका व्यक्तीला पाय दुखत असल्याचे कारण देत सिक लीव्ह घेतली, पण या काळात तो चक्क १६००० पाऊले चालल्याचे त्याच्या कंपनीला समजले आणि त्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
पूर्व चीनमधील जिआंग्सू प्रांतातील एका कंपनीत काम करणाऱ्या चेन नावाच्या या व्यक्तीने २०१९ मध्ये ही रजा घेतली होती. यामुळे एक कायदेशीर लढाईनंतर या प्रकरणाचा निकाल या महिन्यात लागला आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, फेब्रुवारी २०१९ मध्ये चेन यांनी कामाच्या ठिकाणी बॅक स्ट्रेन म्हणजेच पाठीच्या दुखण्याचे कारण देत दोनदा आजारपणामुळे रजेसाठी अर्ज केला. त्यांनी पुरावा म्हणून रुग्णालयातील रिपोर्ट देखील सादर केला आणि त्यांचा अर्ज मंजूरही झाला.
एक महिना आराम केल्यानंतर चेन कामावर परत आले पण त्यानंतर त्यांनी लगेचच दुसऱ्या आजारपणाचे कारण देत दुसऱ्या रजेसाठी अर्ज केला. यावेळी त्यांच्या उजव्या पायात दुखत होते. यावेळी त्यांनी डॉक्टरांनी एक आठवडा आराम करण्याचा सल्ला दिलेले पत्र जोडले होते. हील स्पर म्हणजेच टाच दुखण्याचा त्रास असल्याचे निदान झाल्यानंतर, चेन यांनी आपली रजा अनेक दिवसांसाठी वाढवत नेली.
अनेक दिवसांपासून कामावर गैरहजर असल्याने कंपनीने चेन यांना त्यांचे रुग्णालयाची कागदपत्रे सादर करण्यासाठी कंपनीत येण्यास सांगितले. पण जेव्हा ते ऑफिसात पोहोचले तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्यांना आत प्रवेश दिला नाही.
काही दिवसांनी, कंपनीने चेन यांच्यावर वैद्यकीय स्थितीबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत, कामावर उपस्थित न राहिल्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकले.
प्रकरण कोर्टात
यानंतर चेन यांनी लेबर आर्बिट्रशनचा खटला दाखल केला, ज्यामध्ये दावा केला की त्यांनी घेतलेली रजा ही वैद्यकीय कागदपत्रांसह वैध पद्धतीने घेतली होती. तपासानुसार प्रशासनाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि कंपनीला ११८७७९ युआन (जवळपास १४.८ लाख रुपये) भरपाई देण्याचे आदेश दिले.
त्यानंतर कंपनीने चेन यांना न्यायालयात खेचले. कंपनीने सर्व्हेलन्स फुटेज दाखवले ज्यामध्ये ज्या दिवशी पाय दुखत असल्याचे कारण सांगून रजेसाठी अर्ज केला त्या दिवशी चेन कंपनीकडे धावत येताना दिसून येत होते. त्यांनी चॅट सॉफ्टवेअर रेकॉर्डही दाखवले ज्यामध्ये चेन यांनी त्या दिवशी १६००० स्टेप चालल्याचे दिसत होते, असे रिपेर्टमध्ये नमूद केले आहे.
चेन यांनी दावा केला की कंपनीने सादर केलेले पुरावे हे वैध नाहीत आणि त्यांनी स्वतःचे कंबर व पायांचे स्कॅन असलेले सर्वसमावेशक असे वैद्यकीय रेकॉर्ड्स सादर केले होते. न्यायालयाने आपल्या निकालात, कंपनीने चेन यांना बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकल्याच्या आधारावर, दोन खटल्यांसाठी चेन यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले.
