Coronavirus: ‘लस घ्या मोफत बिर्याणी मिळवा’ योजनेला तुफान प्रतिसाद; ‘लस’वंतांना फ्रीज, दुचाकी जिंकण्याचीही संधी

आधी या ठिकाणी दोन महिन्यात केवळ ५४ जणांनी लस घेतली होती, ही योजना सुरु झाल्यानंतर तीन दिवसात ३४५ जणांनी लसीकरण करुन घेतल्याचं स्वयंसेवक सांगतात

corona vaccine and biryani
बिर्याणीमुळे गावकरी लसीकरण करुन घेत असल्याचं स्वयंसेवी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य: पीटीआय आणि इंडियन एक्सप्रेस)

करोना लसीकरणासाठी सर्वच स्तरातील लोकांनी सहभागी व्हावं यासाठी जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची बक्षिसं आणि भेट वस्तू दिल्या जात आहेत. असाच एक उपक्रम चेन्नईमधील एका गावात सुरु करण्यात आला आहे. मासेमारी करणाऱ्यांची लोकसंख्या अधिक असणाऱ्या गावातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोफत बिर्याणी देण्याची योजना सुरु केलीय. विशेष म्हणजे गावात लस घेणाऱ्या प्रत्येकाला लकी ड्रॉ योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. ही योजना एका सेवाभावी संस्थेने सुरु केलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

मासेमारी हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या कोवलमची लोकसंख्या १४ हजार ३०० इतकी आहे. यापैकी ६ हजार ४०० जण लस घेण्यासाठी पात्र आहेत. एसएटीएस फाउंडेशनमार्फत हे काम केलं जात आहे. या फाउंडेशनचे अधिकारी असणाऱ्या सुंदर यांनी गावकऱ्यांकडून योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये गावातील केवळ ५४ जणांनी लस घेतली होती. त्यामुळेच आम्ही पुढाकार घेऊन फाउंडेशनच्या वतीने लसीकरण मोहीमेला अधिक प्रतिसाद मिळावा म्हणून काय करता येईल आणि लोकांच्या मनातील लसीकरणासंदर्भातील भीती कशी घालवता येईल यासंदर्भात काम करण्यास सुरुवात केल्याचं, सुंदर यांनी आजतकशी बोलताना सांगितलं.

नक्की वाचा >> “अल्लाहसमोर रडत माफी मागीतल्यास करोना नष्ट होईल”; सपा खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

त्यानंतर एसएटीएस फाउंडेशनला एसएन रामदास फाउंडेशन आणि चिराज ट्र्स्टने मदतीचा हात पुढे केला. या संस्थांच्या स्वयंसेवकांनी लसीचा डोस घेणाऱ्यांना मोफत बिर्याण देण्याचं ठरवलं. तसेच लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसं ठेवण्याचंही ठरवण्यात आलं. एसएटीएस फाउंडेशनच्या सुंदर यांनी या योजनेनंतर प्रतिसाद वाढल्याचं सांगितलं आहे. “मागील तीन दिवसांमध्ये ३४५ जणांचं लसीकरण झालं आहे. लकी ड्रॉ योजनेमुळे अनेकजण लसीकरण करुन घेत आहेत. बिर्याणी आणि लकी ड्रॉमध्ये भाग घेता येईल म्हणून लोक पुढे येत आहेत,” असं सुंदर म्हणाले.

या संस्थानी एक आठवड्याचा लकी ड्रॉ ठेवला. यामध्ये मोफत भेट वस्तू विजेत्यांना देण्यात येतात. यात मिक्सर, ग्राइण्डर, सोन्याची नाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एक बम्पर ड्रॉ सुद्धा ठएवण्यात आला असून यामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन आणि अगदी स्कूटर जिंकण्याची संधी लस घेणाऱ्यांना आहे.

नक्की पाहा >> Video: करोनावर मात करण्यासाठी दोन पऱ्या आल्याचं ऐकून शेकडो गावकऱ्यांनी केली गर्दी

रामदास फाउंडेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गौतम रामदास यांनी कोवलम गाव करोनामुक्त करण्याचा आमचा उद्देश आहे. जवळजवळ सात हजार लोक लसीकरणासाठी पात्र आहेत. येथे लवकरात लवकर १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा हेतू आहे. हे गाव भारतामध्ये लसीकरणासंदर्भातील आदर्श गाव म्हणून नावारुपास यावं असा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण गावातील लोकांचे विचार बदलणे थोडं कठीण असेल. मात्र बिर्याणी लोकांना आकर्षित करत आहे. येथील लसीकरण केंद्रावरील वातावरण खूपच वेगळं आहे असं रामदास सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus biryani and freebies to encouraging vaccination in chennai kovalam fisherman village scsg

ताज्या बातम्या