दांडक्यांचा फटके, उठाबशा, बेडूक उड्या, गुन्हा दाखल करणे, दंड वसूल करणे, लेखी माफी लिहून घेणे, हातात बोर्ड पकडून फोटो काढणे असे एकाहून अनेक उपाय करुनही लॉकडाउनच्या काळामध्ये रस्त्यांवर कारण नसताना भटकणाऱ्यांवर काही परिणाम झालेला नाही. त्यामुळेच आता तामिळनाडू पोलिसांनी अशा भटक्या लोकांवर करावाई करण्याची एक मजेदार आणि हटके पद्धत शोधून काढली आहे. तामिळनाडू पोलिसांच्या या पद्धतीचे सोशल नेटवर्किंगवर कौतुक होताना दिसत आहे. कारण नसताना रस्त्यावर भटकणाऱ्यांना थेट करोनाची भिती काय असते याची प्रचिती यावी म्हणून पोलिसांनी थेट अशा भटक्या व्यक्तींना करोनाचा खोटा रुग्ण असणाऱ्या रुग्णवाहिकेमध्ये कोंडले.
देशामधील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक सरकारी यंत्रणांमार्फत लोकांनी घरात थांबावे यासंदर्भातील आवाहन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असं असलं तरी काही अती उत्साही तरुण कारण नसताना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये रस्त्यांवरुन चालत किंवा दुचाकीवरुन भटकताना दिसत आहेत. या अशा तरुणांना अनेक पद्धतीने प्रेमाने, मार देऊन समजवून झाले तरी त्यांचे घराबाहेर येऊन भटकणे थांबताना दिसत नाहीय. त्यामुळेच आता तामिळनाडूमधील पोलिसांनी थेट करोनाच्या मदतीनेच अशा लोकांना घाबरवण्याचं ठरवलं आहे. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नाकाबंदी असणाऱ्या रस्त्यावरुन ट्रीपल सीट भटकणाऱ्या तिघा मित्रांची दुचाकी पोलीस थांबवतात असं या व्हिडिओच्या सुरुवातीला दिसतं. त्यानंतर पोलीस त्यांना समजवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पुढे पोलीस या तिघांना एक रुग्णवाहिकेमध्ये जाण्यास सांगतात. हे तरुण रुग्णवाहिकेचे दार उघडतात तेव्हा आतमध्ये मास्क लावलेला निळ्या रंगाचे रुग्णाचे कपडे घातलेला व्यक्ती दिसतो. हा करोनाचा रुग्ण असून त्याच्याबरोबर तुम्हाला ठेवण्यात येईल असं सांगितल्यावर तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र या तरुणांना धडा शिकवण्यासाठी पोलीस त्यांनी उचलून उचलून या रुग्णावाहिकेमध्ये टाकतात. हे तरुण स्वत:हून या रुग्णावाहिकेत जाण्यास नकार देतात, पोलीस त्यांना रुग्णवाहिकेत कोंबतात. त्यानंतर ही व्यक्ती उठते आणि तरुणांचा एकच गोंधळ उडतो. रुग्णवाहिकेच्या खिडकीमधून आतील गोंधळ शूट करण्यात आला असून हे तरुण अगदी खिडकीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Tamil Nadu Police at work. Lockdown violators put in an ambulance with fake #Covid-19 patient. pic.twitter.com/CvnfRUY33D
— Adam (@Adamiington) April 24, 2020
हा व्हायरल झालेला व्हिडिओ एका मोठ्या व्हिडिओचा भाग असून या मूळ व्हिडिओमध्ये पोलिसांनी जनतेला लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन न करण्याचं आवाहन केलं आहे. मास्क वापरला, सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करा असं पोलीस नागरिकांना सांगत आहेत. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी नियम मोडणाऱ्यांना अशीच अद्दल घडवी पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. तर अनेकांनी पोलिसांच्या कल्पनाशक्तीला दाद दिली आहे.