एखाद्या देशाच्या राष्ट्रध्यक्षांची पत्रकार परिषद म्हटल्यावर पत्रकारांसाठी ती विषेश असणार. राष्ट्राध्यक्ष काय बोलणार, मग त्यांच्या बोलण्याचा योग्य तो अर्थ काढून काय वेगळी बातमी करता येईल?… वगैरे वगैरे प्लॅन आधीच डोक्यात सुरूही झालेले असतात. असंच काहीसं झालं कोस्टारिकाच्या राष्ट्रध्यक्षांच्या परिषदेत. पण राष्ट्राध्यक्षांच्या परिषदेतील भाषणापेक्षा वेगळ्याच अर्थाने ती परिषद गाजली. नुसती गाजली नाही तर जगभरात याची जोरदार चर्चा रंगलीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

त्याच झालं असं की राष्ट्राध्यक्ष पत्रकारांना माहित देण्यात मग्न होते आणि अचानक समोर घोंघावणारी माशी चक्क त्यांच्या तोंडात गेली. आता असा काहीतरी किळसवाणा प्रकार घडल्यावर एखादा बोलणं थांबवेल आणि आधी ती माशी बाहेर काढेल. पण राष्ट्राध्यक्षांनी मात्र असं काहीही केलं नाही. आता पुढे त्यांनी काय केलं हे ऐकलात तर तुम्ही जोरात ‘ई ई ई… शी शी….’ वगैरे बोलाल हे नक्की! कारण जमलेल्या तमाम पत्रकारांच्या समक्ष त्यांनी ती माशी चक्क गिळली आणि वरून आपल्या सहकाऱ्यांकडून पाणी मागून घेतलं आणि या माशीला घशाखालीही उतरवलं. हे वाचून आपण एवढं तोंड वाकडं केलंय तर तिथे जमलेल्या पत्रकारांची तोंड कशी झाली असतील हे वेगळं सांगायला नको. तेव्हा या किसळवाण्या प्रकाराची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.