पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारावर उपाय म्हणून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर कष्टाच्या पैशाला संरक्षण देण्यासाठी नागरिक बँका बाहेर लांबच्या लांब रांगा लावताना दिसत आहेत.नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वत्र नोटांचीच चर्चा सुरु असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर काळ्या पैशाच्या सर्जिकल स्ट्राइकवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्णयाचे स्वागत करताना दिसते. तर कोणी निर्णयामुळे निर्माण झालेल्या समस्याबद्दल संतांप व्यक करत आहे. दरम्यान बँकाबाहेर लागलेल्या रांगासंदर्भात काही विनोदी प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये पुणेरी पाट्यांनीही स्थान मिळविले आहे. बँकेच्या रांगेत उभे राहिल्यानंतर पुण्याच्या बँकेत काय पाट्या दिसतील. यासंदर्भात अनेक विनोद सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. पुणेरी टोमणे नावाच्या फेसबुक पेजवरील व्हायरल होणाऱ्या काही वेचक विनोदावर एक नजर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– ही कोणाच्याही तिर्थरूपांची बँक नसून सर्वांनी लायनीत उभे राहून आत येणे.
– “तुला माईत्ये का मी कोने?” म्हणणाऱ्यांना नोटा बदलून मिळणार नाहीत.
– दादागिरी करणाऱ्यांना जुन्या ५०० च्या नोटा दिल्या जातील.
-फॉर्म नीट भरा, दादा, तात्या, अण्णा, यांना आम्ही ओळखत नाही, कारण आम्ही आत्ता बाप आहोत.
– अरेरावी करू नये, कोणीही तुमच्या मदतीला येणार नाहीत कारण जुना नोटा कामाच्या नाहीत.
– उगाच पाणी वाटप वगैरे कार्य करुन मते ओढण्याचा प्रयत्न करू नये, आणि गर्दी वाढवू नये,आम्ही पाण्याने भरलेला माठ आणि पेला ठेवला आहे. लोकं आपापली घेतील.
– विनाकारण कोणी केमेरे चालू करून लोकांना तुमचे काय मते? काय वाटतंय नोटा बंद झाल्यावर वगैरे लोकांच्या मुलाखती घेत बसू नये, सरकार ने अंतिम निर्णय घेतला आहे,आता कोणी काही बदलू शकत नाही…

– घाई करू नये, ही बँक आहे लोकल ट्रेन नाही.
– कॅशिअर सोबत फालतू वाद घातल्यास केशिअर ला झोपायला स्वतंत्र बेड ची सोय आहे, विचार करून बोला.
– आम्ही तुमचे सेवक आहोत, नोकर नाही.
– हे पुणे आहे, सभ्य भाषेत अपमान करायची इंडायरेक्ट पद्धत आहे.
– नोट हि लक्ष्मी आहे, त्यामुळे तिच्यासोबत इथे सेल्फी काढत बसू नये…
– थोडा उशीर होत असलेतरी भाईगिरी न करता लायनीतच थांबावे, इथे आजूबाजूला पोलीस आहेत, आणि तुमच्याकडे 500-1000 व्यतिरिक्त दुसऱ्या नोटा नाहीत.
– गर्दी असल्याने वेळ लागणारच, तरी कृपया सारखं पिचिक पिचिक आवाज काढू नये… घरी पैसे साठवायला आम्ही सांगितलं न्हवते.
– हा परीक्षा हॉल नाही, तरी, इतरांचा फॉर्म पाहून भरू नये.
– अजून किती वेळ लागेल वगैरे फाजील प्रश्न विचारू नये,
कारण त्याचे उत्तर आम्हालाही माहित नाही.
– इथे गाडी पार्क केली तर चालेल का वगैरे पांचट प्रश्न विचारू नये.
-एटीएम चालू आहे का हे पाहण्यासाठी एटीएम च्या बाहेर लाईन आहे का ते पाहावे.
– सरकार कडून मिळालेलेच फोटो भिंतीवर लावले आहेत, तरी आमच्या यांचा फोटो नाहीये वगैरे वाद घालू नये.
– “शी बाबा” म्हणून उकडणे थांबत नाही, तुमच्या इतकंच आम्हालाही उकडते आहे, आणि आहेत तेवढे सगळे फॅन्स चालू ठेवलेत.
–  आमच्याकडे ज्या नोटा अव्हेलेबाल आहेत त्याच आम्ही देऊ शकतो, आमचा स्वतःचा नोट छापायचा कारखाना नाही.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cupuneri patya jokes viral on social media after modi govt currency ban
First published on: 15-11-2016 at 19:05 IST