करोना महामारीमुळे 2020 हे वर्ष सर्व जगासाठीच वाईट ठरलं, पण हे वर्ष संपताना अमेरिकेच्या जियाना डि एंजेलो नावाच्या तरुणीसाठी मात्र चांगलंच फायदेशीर ठरलंय. सध्या करोनामुळे अनेक कंपन्या बंद झाल्यात, तर बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. पण एका रेस्तरॉंमध्ये वेट्रेस म्हणून काम करणाऱ्या जियाना डि एंजेलोसाठी ही वर्ष अनोखं ठरलं.

पेन्सिल्वेनियामधील इटालियन रेस्तराँमध्ये जियाना वेट्रेस म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वी या रेस्तराँमध्ये जवळच गोल्फ खेळणाऱ्यांचा एक ग्रुप आला. त्यांचं बिल जवळपास 15 हजार रुपये झालं होतं, पण जाताना त्यांच्यातील एकाने टेबलवर जियानासाठी टिप सोडली. त्या टिपची रक्कम पाहून जियाना चांगलीच हैराण झाली. कारण 205 डॉलर (15 हजार रुपये) इतकं त्यांचं बिल झालं होतं, पण त्याने जियानासाठी टिप म्हणून तब्बल 5,000 डॉलर ( जवळपास 3.67 लाख रुपये) दिले. करोना व्हायरस महामारी आणि काही दिवसांवर येऊ घातलेल्या ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर त्या ग्राहकाने वेट्रेसला इतकी जास्त टिप दिली.

यानंतर त्या इटालियन रेस्तराँने बिलाचा आणि दिलेल्या टिपचा फोटो आणि त्यासोबत…आमच्याकडे थँक्यू बोलण्याशिवाय दुसरा कोणताच शब्द नाहीये….आमच्या कर्मचाऱ्यांना अविश्वसनीय मदत केल्याबद्दल धन्यवाद…अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तर, एबीसीला दिलेल्या मुलाखतीत जियानाने आनंद व्यक्त केला आणि मी तर कितीही रुपयांच्या टिपमध्ये खूश होते….पण ज्यावेळी त्यांनी 5000 डॉलर्स म्हटलं तेव्हा मला विश्वासच बसला नाही असं ती म्हणाली. या पैशांतून शिक्षण पूर्ण करणार असल्याचंही तिने सांगितलं.


दरम्यान सोशल मीडियावर सध्या या बिलाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.