उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. एका लग्नाच्या वरातीमध्ये अचानक सुसाट आलेली कार घुसली आणि अनेक वऱ्हाड्यांना चिरडलं. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर १२ पेक्षा जास्त जखमी झालेत.

मुजफ्फरनगरच्या नई मंडी परिसरात मंगळवारी हा अपघात झाला. विशेष म्हणजे अपघात झाला त्यावेळी होणारी नवरी कारचं सनरुफ उघडून आनंदात नाचत होती. सुदैवाने ती या अपघातात थोडक्यात बचावली. दिल्ली-देहरादून हायवेवरील एका लग्नसभागृहात हेमा आणि अंकुरचं लग्न ठरलं होतं. लग्नाची वरात सभागृहाजवळ आल्यावर नवरदेवाकडची वरात बघून हेमाने आनंदात कारचं सनरुफ उघडून नाचण्यास सुरूवात केली. नाचताना थोड्याचवेळात दोन्ही कडील वरात एकत्र आल्या. एकत्र नाचत असतानाच अचानक सुसाट आलेली एक कार वरातीत घुसली व अनेकांना चिरडलं. यात नवरदेव अंकुरच्या चुलत भाऊ प्रमोदचा मृत्यू झाला, तर १२ पेक्षा जास्त जखमी झाले. जखमींना मेरठच्या रुग्णायलात दाखल करण्यात आलं आहे. तर, पोलिसांनी घटनास्थळावरुन कार ताब्यात घेतली, पण ड्रायव्हर मात्र फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.


या भीषण अपघाताचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.