चुकीच्या हेअरकटमुळे बसला थेट दोन कोटींचा दंड

विशिष्ट सूचना करूनही हेअरस्टायलिस्टने आपले केस अत्यंत चुकीच्या पद्धतीने कापल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता.

delhi-hotel-2-crore-penalty-for-bad-haircut-gst-97
हेअर कट चुकला अन् २ कोटींचा दंड बसला (Photo : Pixabay)

राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) एका लक्झरी हॉटेलला एका महिलेला नुकसानभरपाई म्हणून तब्बल दोन कोटी देण्याचे निर्देश दिले आहेत. विशिष्ट सूचना करूनही हेअरस्टायलिस्टने आपले केस अत्यंत विचित्र आणि चुकीच्या पद्धतीने कापल्याचा आरोप या तक्रारदार महिलेने केला होता. “हेअरस्टायलिस्टने केलेल्या या चुकीमुळे महिलेला तिची अपेक्षित कामं गमवावी लागली. प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. तिची जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आणि टॉप मॉडेल बनण्याचं तिचं स्वप्न उध्वस्त झालं”, असं आयोगाने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष आर.के. अग्रवाल आणि सदस्य डॉ. एस.एम. कांतीकर यांच्या खंडपीठाने हॉटेलला या महिलेला दोन कोटींची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, या महिलेने हेअरड्रेसरला आपल्या हेअरकटसंदर्भात काही स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरी देखील त्या सूचना न पाळता अत्यंत चुकीच्या पद्धतीने केस कापल्याचा आरोप करण्यात आलाआहे. “आमचा विचार आहे की तक्रारदार महिलेला २ कोटींची भरपाई दिली गेली तर तिला न्याय मिळण्यास मदत होईल. स्त्रिया आपल्या केसांच्या बाबतीत खूप सावध असतात यात शंकाच नाही. त्या त्यांच्या केसांशी भावनिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या असतात. अशातच तक्रारदार महिला ही केसांच्या उत्पादनांसाठी मॉडेलिंग करत होती. कारण तिचे केस लांब होते. तिने VLCC आणि Pantene साठी मॉडेलिंग केलं आहे”, असं एनसीडीआरसीने (NCDRC) सांगितलं आहे.

गंभीर मानसिक आघात

“महिलेच्या सूचनांविरूद्ध केलेल्या हेअरकटमुळे तिने आपली पुढची अपेक्षित सर्व कामं गमावली आहे. तिला खूप मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. ज्यामुळे तिची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. तिचं टॉप मॉडेल होण्याचं स्वप्न उध्वस्त झालं आहे. ती एक वरिष्ठ व्यवस्थापन व्यावसायिक म्हणून देखील काम करत होती आणि योग्य उत्पन्न मिळवत होती. मात्र, तिचे केस कापण्यात विरोधी पक्षाच्या (हॉटेल सलून) दुर्लक्षामुळे तिला मोठा धक्का बसला, गंभीर मानसिक आघात सहन करावा लागला. ती नोकरी देखील करू शकली नाही. अखेर शेवटी तिने आपली नोकरीही गमावली”, असं एनसीडीआरसीने सांगितलं.

तक्रारीनुसार, ती महिला एका इंटरव्ह्यू पॅनलसमोर हजर होणार होती. त्यापूर्वी म्हणजे १२ एप्रिल २०१८ रोजी तिच्या इंटरव्ह्यूच्या एक आठवडा आधी तिने एका हॉटेलच्या सलूनला भेट दिली. मात्र, त्यावेळी तिथे तिचा ठरलेला हेअरस्टायलिस्ट उपलब्ध नसल्याने एका दुसऱ्या हेअरस्टायलिस्टकडून हेअरकट करून घेण्यास तिने तयारी दाखवली. यावेळी, या महिलेने त्या हेअरस्टायलिस्टला काही विशिष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही या हेअरस्टायलिस्टने त्या कोणत्याही सूचना पाळल्या नाहीत. त्याने महिलेचे वरून फक्त चार इंचापर्यंतचे केस सोडून बाकी संपूर्ण केस कापून टाकले. जे फार मुश्किलीने तिच्या खांद्यापर्यंत येत होते. त्यानंतर, या महिलेला मोठा धक्का बसला. तिने मॅनेजरकडे याबाबतची तक्रार दाखल केली.

हेअरस्टायलिस्टवर कोणतीही कारवाई न झाल्याने तक्रारदार महिलेने १३ एप्रिल २०१८ रोजी सलूनच्या जनरल मॅनेजरला या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितलं. मात्र, त्याने तिच्याशी गैरवर्तन करून ती सलूनविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास मोकळी असल्याचं म्हणत अरेरावीची भाषा केली. शेवटी, तक्रारदाराने व्यवस्थापनाशी संपर्क साधला आणि त्यांना घटनेची माहिती दिली. परंतु ते सगळं व्यर्थ ठरलं. अखेर तक्रारदार महिलेने हॉटेल व्यवस्थापनावर टीका करत लेखी माफी आणि छळ, अपमान, मानसिक छळासाठी भरपाई मागितली. मात्र, हॉटेल व्यवस्थापनाने त्याला विरोध केला.

महिलेचे आरोप हे अतिशयोक्तीपूर्ण | हॉटेल व्यवस्थापन

हॉटेलने म्हटलं कि, तक्रारदार महिलेचे आरोप हे अतिशयोक्तीपूर्ण आणि कोणत्याही आधाराशिवाय आहेत. तक्रारदार महिलेने सलूनमध्ये केस कापण्याची आणि केसांच्या उपचारांची सेवा विनामूल्य घेतली होती. त्यामुळे, ती सेवा कायद्याच्या कक्षेत येत नाही असं हॉटेल व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. तक्रारदाराने प्रतिष्ठा बिघडवण्याच्या हेतूने ही तक्रार केल्याचं देखील यावेळी हॉटेल व्यवस्थापनने म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi hotel 2 crore penalty for bad haircut gst

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी