Delhi Women Quits Government Job: सरकारी नोकरी मिळावी म्हणून भारतातील सर्वच राज्यातील युवकांमध्ये स्पर्धा दिसून येते. सरकारी नोकरीला भारतात एक वेगळी सामाजिक प्रतिष्ठा आहे. सरकारी नोकरी असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा असतो. एकदा का अशी नोकरी मिळाली तर ‘आयुष्य सेटल’ अशीच अनेकांची भावना असते. मात्र दिल्लीत राहणाऱ्या एका तरूणीनं हसतखेळत सरकारी नोकरीला राम राम ठोकला आहे. तिची कहाणी तिने इन्स्टाग्राम व्हिडीओतून मांडली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत काम करणाऱ्या २९ वर्षीय तरूणीने तरूणीने सरकारी नोकरी सापळ्यासमान असल्याचे सांगून नोकरीला लाथ मारली आहे. वणी नावाच्या तरूणीने तिची आपबिती व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले, “सर्व हिरोंच्या डोक्यावर मुकूट नसतो, काही जण कुचंबणा होत असलेली नोकरी सोडतात. मीही माझ्या आयुष्यातील हा अध्याय आज बंद केला.” वणीने या व्हिडीओत सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची नोकरी सोडण्याचे कारण सांगितले आहे.

२००० साली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि एक वर्षाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर वणीला मेरठमधील बँक शाखेत स्केल-१ अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. तिच्याकडे कर्जाशी संबंधित विभाग सोपविण्यात आला होता.

वणीने म्हटले की, या नोकरीने मला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले असले, माझी जीवनशैली उंचावत असली तरी मला या नोकरीत समाधान नव्हते. ही नोकरी मानसिकदृष्ट्या थकवणारी आणि कृतघ्न अशी आहे. मी हळू हळू अशी व्यक्ती बनत चालली आहे, जिचा मलाच तिरस्कार वाटेल. ही नोकरी मिळण्याआधी मी खूप आनंदी जीवन जगत होते. मात्र गेल्या तीन वर्षांत मी खूप चिडचिड करण्यास लागले होते.

यामुळेच आता आर्थिक स्थैर्याऐवजी मानसिक शांतता निवडण्याची वेळ आली आहे. म्हणून मी शांती निवडून नोकरीचा राजीनामा देत आहे. वणीने पुढे म्हटले की, मला कुणाचेही खच्चीकरण करायचे नाही. पण माझी कहाणी मला सांगायची आहे.

वणीच्या व्हिडीओखाली अनेकांनी तिला शुभेच्छा देणाऱ्या कमेंट केल्या आहेत. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.