बोगस नोटा जप्त, बोगस नोटा बनवणारी टोळी गजाआड, अशा अनेक बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या आणि वाचल्या असतील. जग पैशांशिवाय चालू शकत नाही. त्यामुळेच पैशांचे व्यवहार हे नेहमीच होतच असतात. याचाच फायदा घेऊन बोगस नोटा तयार केल्या जातात. यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होते. मात्र ‘युरो’ या चलनाची नक्कल करणे अत्यंत अवघड आहे. युरोपच्या मध्यवर्ती बँकेने केलेल्या तंत्रज्ञानाच्या उत्तम वापरामुळे युरोची नक्कल होणे जवळपास अशक्य आहे.

युरोच्या चलनासाठी युरोपियमचा वापर केला जातो. त्यामुळे अल्ट्रा वॉयलेट लाईटखाली ठेवताच या नोटा चमकतात. या नोटा ज्या कागदापासून तयार केल्या जातात, त्या कागदाला लकाकी असते. मात्र लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाची ही लकाकी चलन अल्ट्रा वॉयलेट लाईटखाली ठेवल्यावरच दिसून येते.

युरोपच्या मध्यवर्ती बँकेने छापलेल्या नोटांच्या समोरच्या भागात दोन प्रकारची शाई दिसून येते. अल्ट्रा वॉयलेट लाईट पडताच यातील निळ्या रंगाची शाई हिरवी दिसू लागते, तर पिवळ्या रंगाची शाई केशरी रंगाची दिसते. अल्ट्रा वॉयलेट लाईटमुळे चलनावर असणारा युरोपियन झेंडा आणि युरोपच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरची सही केशरी रंगात दिसते.

सौजन्य- इंटरनेट
सौजन्य- इंटरनेट

अल्ट्रा वॉयलेट लाईटमध्ये चलनाच्या दुसऱ्या बाजूला फक्त एकाच रंगाची शाई दिसते. युरोपचा नकाशा, एक पूल पिवळ्या रंगात दिसून येतात.

सौजन्य- इंटरनेट
सौजन्य- इंटरनेट

युरोपियमच्या वापरामुळे युरोची नक्कल करुन बोगस चलन तयार करणे जवळपास अशक्य होते. १५ धातूंच्या रासायनिक घटकांचा वापर करुन युरोपियमची निर्मिती करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक टोळ्या बनावट नोटा तयार करतात. मात्र या टोळ्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत अशी काही करामत करण्यापूर्वीच युरोपच्या मध्यवर्ती बँकेने त्याच तंत्रज्ञानाचा आधार घेत या टोळ्यांपेक्षा कित्येक पावले पुढे टाकली आहेत.