एखाद्या देशातील नेतृत्वाचा किंवा नेत्याचा विरोध करायचा असेल तर सामान्यपणे मोर्चे काढले जातात, आंदोलने केली जातात. या आंदोलनांमध्ये पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून नेत्यांवर टीका केली जाते. मात्र ऑस्ट्रेलियातील एका शिल्पकाराने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या डोक्याचे एक मोठे शिल्प उभारण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात काय आहे तुम्हीच पाहा असं सांगण्यासाठी उभारलेलं हे शिल्प एका बसस्टॉपच्या आकाराचे आहे. विशेष म्हणजे हे शिल्प आतमधून रिकामे आहे.
ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरीया येथील बल्लारॅट शहरामध्ये कॅलम मारटॉन या शिल्पकाराने ट्रम्प यांच्या डोक्याचे शिल्प उभारले आहे. तीन मीटर उंचीचे हे शिल्प फायबर ग्लास, रेझीन आणि लाकडापासून बनवला आहे. या कलाकृतीला कॅलमने ‘हेल्टर शेल्टर’ असं नाव दिलं आहे. या अर्धा गोलाकृती शिल्पाच्या आतमध्ये एक बाकडा असून तिथे सावलीत बसवण्याची सोय करुन दिली आहे. या शिल्पाच्या आजमध्ये नरकातील ज्वाला दाखवणारे नक्षीकाम करण्यात आले आहे.
जगभरातील वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये सहभागी झालेले कॅलम हे मोनॅश विद्यापिठामध्ये कला विभागात प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांनी ही कलाकृती ऑस्ट्रेलियातील अनेक प्रदर्शनांमध्ये सादर केली आहे. या कलाकृतीबद्दल ‘गार्डीय ऑस्ट्रेलिया’शी बोलताना कॅलम, “मला ठाऊक आहे ही कलाकृती एकदम कुरूप आणि अश्लील आहे. अगदी ट्रम्प यांच्यासारखीच आहे,” असं मस्करीमध्ये सांगतो.
“या शिल्पाच्या आतील बाजूस असणाऱ्या ज्वाला या सध्या जगभरात लागणारे वणवे दर्शवतात. आपल्या देशात (ऑस्ट्रेलिया) वणवा पेटला आहे. वातावरणातील बदलांना कमी महत्व देणाऱ्या (ट्रम्प) यांच्यासारख्या व्यक्तींमुळे सध्या जगभरात पर्यावरणासंदर्भातील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज आपण संपूर्ण जगाचा विचार करायला हवा,” असं कॅलम सांगतो. “ज्यांना ट्रम्प आवडतात ते वेडे असतात. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही अशाच प्रकारचे आहेत,” असं कॅलम सांगतो. “या कलाकृतीकडे कसे बघावे हे मी पाहणाऱ्यांना सांगत नाही. ते त्यांची दृष्टी घेऊन येतात आणि कलाकृती पाहतात,” असंही कॅलमने स्पष्ट केलं.