बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी सुरक्षितरित्या पोहोचवणं हे बस चालकाचं काम असतं. मरेपर्यंत हे काम चोखपणे बजावणारी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमधून राजस्थानच्या जोधपूर येथे जाणाऱ्या बसच्या एका चालकानं अस्वस्थ वाटू लागताच आपल्या सहचालकाकडे बसचं नियंत्रण दिलं आणि काही वेळानं जीव सोडला. सदर घटना बसच्या केबिनमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चालकाच्या मृत्यूची करूण गाथा कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेवर आता हळहळ व्यक्त होत आहे.
हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच मृत्यूनं गाठलं
मृत पावलेल्या चालकाचं नाव सतीश राव असं आहे. सहचालकाकडं बस दिल्यानंतर सहचालकानं बस तात्काळ रुग्णालयाच्या दिशेनं नेली. मात्र सतीश राव यांची प्रकृती इतकी खालावली की, वाटेतच चालत्या बसमध्ये त्यांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली येथे ही घटना घडली.
सतीश राव चालवत असलेली बस इंदूरहून जोधपूरच्या दिशेने निघाली. मात्र वाटेतच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळं त्यांनी सहचालकाला बस चालविण्यास दिली. सहचालकाने तात्काळ एका जवळच्या मेडीकल दुकानाकडे बस थांबवली. पण ते दुकान बंद होते. पुढे एखादे हॉस्पिटल येईल, अशी अपेक्षा करत त्यांनी बस चालू ठेवली.
व्हिडीओमध्ये काय दिसलं?
व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्ही व्हिडीओत सतीश राव केबिनमध्ये चालकाच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. त्यांच्याशेजारी एक प्रवासी महिलाही आहे. काही वेळातच प्रवासी असलेले काही लोक केबिनजवळ येतात आणि सतीश राव यांना उचलून रुग्णालयात नेतात. पण तिथे त्यांना मृत घोषित केले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राव यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर राव यांच्या कुटुंबियांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला आणि त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले. सतीश राव यांनी प्रसंगावधान दाखवत बस वेळीच सहचालकाच्या ताब्यात दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी भावना आता व्यक्त केली जात आहे.
पाहा व्हिडीओ
चित्तोडगडमध्ये गुगल मॅप्समुळं अपघात
आणखी एका घटनेत राजस्थानमध्ये एक विचित्र अपघात झाला. गुगल मॅप्सचा आधार घेऊन चालणारी एक व्हॅन बंद असलेल्या ब्रिजवर पोहोचली आणि पुढे बनास नदीच्या प्रवाहात बस वाहून गेली, असा आरोप केला जात आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक मूल बेपत्ता आहे.