सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती पोलीस ठाण्यात येऊन आपल्या पोटच्या मुलाची तक्रार करताना दिसत आहेत. मुलगा दारु पिऊन आपल्याला व आपल्या पत्नीला मारहाण करतो, अशी तक्रार संबंधित वयोवृद्ध व्यक्ती करत आहे. या वृद्धाची तक्रार ऐकल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने वयोवृद्ध व्यक्तीची आपुलकीने विचारपूस केली. तसेच मारहाण करणाऱ्या मुलाला धडा शिकवला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ स्वत: पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला.

डीसीपी संतोष पटेल असं संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात सेवेवर आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मुलाकडून मारहाण होणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला कशाप्रकारे न्याय मिळवून दिला, याचा थोडक्यात आढावा दिला आहे.

मुलाकडून मारहाण होत असल्याची तक्रार घेऊन आलेल्या वृद्धाची डीसीपी संतोष पटेल यांनी आपुलकीने विचारपूस केली. तसेच वृद्धाला गाडीत बसून त्यांच्या गावी नेलं. तिथे मुलाला माफी मागण्यास भाग पाडलं. वडील पोलिसांना घेऊन आल्याचं पाहताच मुलगा आपल्या वृद्ध वडिलांसमोर नतमस्तक झाला. पुन्हा मारहाण करणार नाही, म्हणत मुलाने माफी मागितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर करताना डीसीपी संतोष पटेल यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, “एक वृद्ध व्यक्ती पायातील चप्पल काढून कार्यालयाबाहेर आली. कदाचित त्यांना पोलिसांकडून न्याय आणि मदत मिळेल यावर विश्वास असावा. त्यांचा दारूडा मुलगा त्यांना आणि त्यांच्या बायकोला मारहाण करतो, अशी तक्रार त्यांनी केली. यानंतर तक्रारदार वृद्धाच्या गावी जाताच त्यांच्या मुलाने पाया पडून माफी मागायला सुरुवात केली. हे केवळ पोलिसांच्या नोकरीतच शक्य आहे.”