उर्जेला सलाम! हैदराबादच्या ‘या’ दाम्पत्याने गेल्या ११ वर्षांत शहरातील दोन हजाराहून अधिक खड्डे भरले

हैद्राबादमधील एक जोडपं गेल्या तब्बल ११ वर्षांपासून तुम्हाआम्हाला छळणारी एक समस्या सोडवण्यासाठी अथक आणि अविरत प्रयत्न करत आहेत.

Hyderabad old couple filling potholes past 11 years
७३ वर्षीय गंगाधर टिळक कटनाम आणि त्यांच्या ६४ वर्षीय पत्नी व्यंकटेश्वरी कटनाम गेली ११ वर्षे हैद्राबादमधील खड्डे भरण्याचं काम करत आहे.

दुर्दम्य इच्छाशक्ती, ठाम निश्चय आणि निर्मळ भावना ह्या गोष्टी नेहमीच माणसाला असामान्य बनवतात. ह्याचंच एक चिरतरुण उदाहरण आता सामोरं आलं आहे. हैद्राबादमधील एक जोडपं गेल्या तब्बल ११ वर्षांपासून तुम्हाआम्हाला छळणारी एक समस्या सोडवण्यासाठी अथक आणि अविरत प्रयत्न करत आहेत. ही समस्या म्हणजे रस्त्यांवरचे खड्डे. रस्त्यांचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम आणि नियमित दुरुस्ती न करणं यामुळे आपल्याकडे दररोज शेकडो अपघात होतात. अनेक जण जीवानिशी जातात. परंतु, तरीही देशभरात सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात ही परिस्थिती सारखीच आहे. मग कितीही मोठं शहर असू दे किंवा कोणतंही राज्य. ही समस्या गंभीर असूनही अपेक्षित सुधारणा दिसत नाही. अशावेळी या दाम्पत्याने पुढाकाराने आपल्या हाती घेतलेल्या कामाचं कौतुक करावं तितकं कमीच!

सेवानिवृत्त रेल्वे अभियंते असलेले ७३ वर्षीय गंगाधर टिळक कटनाम आणि त्यांच्या ६४ वर्षीय पत्नी व्यंकटेश्वरी कटनाम हे विविध रस्ते आणि चौकांच्या दिशेने आपला प्रवास सुरु करतात. हे दोघेही स्वतःच्या गाडीतून विविध रस्त्यावर फिरतात आणि पाहणी करतात. आपल्या या वाहनाला ते ‘पॅथहोल अ‍ॅम्ब्युलन्स’ असं म्हणतात. यावेळी फिरताना रस्त्यावर त्यांना जिथे जिथे खड्डे दिसतील तिथे तिथे थांबून ते हे सगळे खड्डे भरतात. कित्येक वर्षांच्या त्यांच्या या कष्टांमागे एक निर्मळ भावना आहे. ती म्हणजे, “या रस्त्यांमुळे कोणाचाही अपघात होऊ नये, कोणालाही जीव गमवावा लागू नये.”

(Photo : ANI)

स्वखर्चाने आतापर्यंत तब्बल २ हजारांहून अधिक खड्डे भरले

गंगाधर कटनाम आणि व्यंकटेश्वरी कटनाम यांच्या या कामाला सुरुवात नेमकी कशी झाली? तर रस्ते दुरुस्तीबाबाबत अनेकदा विनंत्या करूनही अधिकाऱ्यांनी वारंवार दुर्लक्ष केल्याने गंगाधर कटनाम यांनी हे काम स्वतःच हाती घेतलं. विशेष म्हणजे या कामासाठी लागणारा संपूर्ण खर्च ते स्वतःच्या खिशातून करत. दर महिन्याला मिळणाऱ्या आपल्या अगदी थोडक्या पेन्शनमधून आपल्या या कामासाठी लागणारा सगळा खर्च ते देत. आणखी एक विशेष बाब म्हणजे या दोघांनीही मिळून आतापर्यंत तब्बल दोन हजाराहून अधिक खड्डे भरण्याचं काम स्वखर्चाने केलं आहे. यासाठी त्यांना ४० लाख रुपये इतका खर्च आल्याची माहिती मिळते.

भारतीय रेल्वेमध्ये ३५ वर्षे बजावली सेवा, निवृत्तीनंतर हाती घेतलं हे काम

गंगाधर कटनाम एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधतांना, आपल्या या कामाविषयी माहिती देताना सांगतात, “मी भारतीय रेल्वेमधून निवृत्त झाल्यानंतर हे काम हाती घेतले. मी दररोज खड्ड्यांमुळे झालेले अपघात पाहिले होते. स्वतः याबाबत संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार देखील केली होती. परंतु, हा प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळे माझ्या निवृत्ती वेतनातून मिळणारे पैसे वापरुनच आम्ही हे काम करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आत्तापर्यंत २ हजारांहून अधिक खड्डे भरले आहेत आणि त्यासाठी सुमारे ४० लाखांचा खर्च आला.” दरम्यान, या कामासाठी त्यांना आता “रोड डॉक्टर” म्हणून नवी ओळख मिळाली आहे.

(Photo : ANI)

गंगाधर कटनाम यांनी भारतीय रेल्वेमध्ये ३५ वर्षे सेवा बजावली आहे. आपल्या सेवानिवृत्तीनंतर ते तेलंगणाच्या राजधानीत अर्थात हैदराबादमध्ये आले. त्यानंतर इंजिनिअर म्हणून त्यांनी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी देखील करण्यास सुरुवात केली. मात्र, शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि सततचे अपघात पाहून अखेर त्यांनी आपली नोकरी सोडली आणि ह्या कामात स्वतः ला झोकून दिलं. काही वर्षे स्वत: काम केल्यानंतर या जोडप्याने ‘श्रमधन’ नावाची संस्था सुरू केली. त्यामार्फत लोक खड्डे भारण्यासाठी लागणार साहित्य खरेदी करण्यासाठी स्वेच्छेने देणगी देऊ शकतात. त्यांच्या या कामाने तिथल्या देखील अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आता हे अधिकारी या दाम्पत्याला त्यांच्या कामासाठी आपल्यापरीने शक्य ती सर्व मदत देऊ करतात.

गंगाधर कटनाम म्हणतात कि, “प्रत्येकजण एकमेकांना मदत करत राहील तर अनेक समस्या अगदी सहजरित्या सोडवता येऊ शकतात. आपण निश्चित बदल घडवू शकतो.” दरम्यान, निश्चितच वयाने वृद्ध असले तरी तरुणांना लाजवेल अशा प्रचंड ऊर्जेने काम करणाऱ्या या दाम्पत्याच्या कामाला सलाम! अपेक्षा आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून जोमानं कामाला लागावं जेणेकरून या दाम्पत्याचे कष्ट सफल होतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Elderly couple filling potholes hyderabad past 11 years gst

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या