इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात टेस्ला कंपनीने घेतलेली आजची झेप बघून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण एकवेळ अशीही होती जेव्हा दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला विकण्याची तयारी सुरू होती. विशेष म्हणजे टेस्लाचे प्रमुख एलन मस्क हे स्वतःच ही कंपनी विकण्याच्या विचारात होते. इतकंच नाही तर मस्क यांनी दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलसमोर टेस्ला विकत घेण्याचा प्रस्तावही ठेवला होता. पण, अ‍ॅपलने ही सोन्यासारखी संधी गमावली. खुद्द एलन मस्क यांनीच हा हैराण करणारा खुलासा केलाय.

अ‍ॅपलच्या सेल्फ ड्रायव्हिंग कारवरुन साधला निशाणा :-
अलिकडेच अ‍ॅपलने सेल्फ ड्रायव्हिंग कारची घोषणा केली. त्यानंतर मस्क यांनी अ‍ॅपलच्या कारवर निशाणा साधणारं ट्विट केलं असून त्यामध्येच हा खुलासा केला आहे. “कार बनवण्यासाठी अ‍ॅपल ज्या मटेरियलचा वापर करणार आहे ते मटेरियल तर टेस्ला आधीपासूनच आपल्या कारमध्ये वापरत आहे” असा टोला मस्क यांनी अ‍ॅपलला मारलाय.

टिम कुक यांनी बैठकीसाठी दिला नकार:-
वर्ष 2017 मध्ये टेस्लाला आर्थिक चणचण जाणवत होती, त्यावेळी टेस्लाने मोठ्या प्रमाणात बाजारात मॉडेल 3 इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन सुरू केलं होतं. तेव्हा सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कंपनीने वाईट दिवसांचा अनुभव घेतला असं मस्क यांनी सांगितलं. मॉडेल-3 प्रोग्रामच्या वाईट काळात अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांना टेस्ला खरेदी करण्याची ऑफर देण्यात आली होती, पण कुक यांनी बैठकीसाठी नकार दिला, असं मस्क म्हणालेत. ज्यावेळी कुक यांना ही ऑफर देण्यात आली होती त्यावेळी टेस्लाची मार्केट व्हॅल्यू आजच्या तुलनेत फक्त एक दशांश (1/10 ) होती. “मॉडेल-३ प्रोग्रामच्या संघर्षाच्या काळामध्ये मी टिम कुक यांच्याशी अ‍ॅपलने टेस्लाला खरेदी करावं यासाठी संपर्क साधला होता. पण त्यांनी बैठकीसाठीच नकार दिला”, असा खुलासा मस्क यांनी ट्विटरद्वारे केला आहे.


दरम्यान, मस्क यांच्या या ट्विटवर अ‍ॅपलकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.