पुणे : एका ३३ वर्षीय निरोगी तरुणाला अचानक पापण्यांची उघडझाप करण्यास आणि अन्न गिळण्यास त्रास होऊ लागला. त्याचे हात आणि पायही बधीर होऊन चालण्यात अडचणी येऊ लागल्या. या तरुणाची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला दुर्मीळ असलेला ‘मिलर फिशर’ सिंड्रोम असल्याचे समोर आले. या तरुणावर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्याने या विकारावर यशस्वीपणे मात केली आहे.

या तरुणाला अचानक प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याने एका रुग्णालयात जाऊन एमआरआय स्कॅन केले. मात्र, त्या तपासणीत काहीही आढळले नाही. नंतर हा रुग्ण बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. रुग्णाची लक्षणे पाहून तेथील डॉक्टरांनी मिलर फिशर सिंड्रोमचे प्राथमिक निदान केले. त्याच्या तपासण्यांमध्ये हाच विकार झाल्याचे निष्पन्न झाले. मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. श्रुती वडके यांनी रुग्णावर इम्युनोग्लोब्युलिन्सचे उपचार सुरू केले. या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्तीवर नियंत्रण येऊन रक्तवाहिन्यांवर हल्ला करणाऱ्या रक्तातील प्रतिपिंडांवरही नियंत्रण प्राप्त झाले. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्याने रुग्ण लवकर बरा झाला आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय त्याला घरी पाठवण्यात आले.

हेही वाचा – रिक्षाचालकाने भाडे नाकारले, आता व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार करा अन् तातडीने होणार कारवाई

याबाबत डॉ. श्रुती वडके म्हणाल्या की, मिलर फिशर सिंड्रोमचे निदान करणे खूपच आव्हानात्मक असते. कारण याची लक्षणे ही वेगवेगळ्या आजारांप्रमाणे असल्याने चुकीचे निदान होऊ शकते. लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे हे खूप महत्त्वाचे असते. वेळीच निदान होऊन उपचार न झाल्यास आजाराची गुंतागुत वाढते आणि भविष्यात अपंगत्वही येऊ शकते.

हेही वाचा – राज्यातील १ लाख ३१ हजार अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, आता होणार काय?

मिलर फिशर सिंड्रोम म्हणजे काय?

मिलर फिशर सिंड्रोम (एमएफएस) हा एक दुर्मीळ आजार आहे. हा आजार दरवर्षी दहा लाख लोकांपैकी केवळ एक ते दोन जणांमध्ये आढळतो. हा आजार विषाणू संसर्गानंतर सुमारे चार आठवड्यांच्या कालावधीत होतो. हा आजार मज्जातंतूवर हल्ला करतो. यामुळे डोळ्याच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि डोळ्यांची हालचाल करताना त्रास होतो. तसेच सांध्यांची हालचाल कठीण होऊन अस्थिरता येते. यामध्ये कधीकधी गिळण्याची क्रिया अवघड बनते आणि सांध्यांमध्ये अशक्तपणाही जाणवू लागतो. वेळीच उपचार न झाल्यास काही रुग्णांमध्ये हा आजार वेगाने बळावून श्वास घेण्यास त्रास होणे आणि यावर उपाय म्हणून व्हेंटिलेटरची गरज भासते.