Emotional Video Viral: मुलं देवाघरची फुलं, असं म्हणतात; पण काही मुलांना अगदी लहानपणापासूनच संघर्ष करावा लागतो. खेळण्याच्या-बागडण्याच्या वयातच त्यांच्यावर जबाबादारी येते. निरागस असण्याच्या वयात त्यांच्यात आपोआप शहाणपण येतं आणि यामागचं कारण असतं ते म्हणजे परिस्थिती.
परिस्थिती सगळं काही शिकवते, असं म्हणतात. त्यात गरिबी वाट्याला आली की, जगणं खूपच अवघड होऊन जातं. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहून कळतं परिस्थिती म्हणजे काय. या लहान सहान गोष्टी आपल्याला आयुष्यात खूप काही शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल
एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती भरपावसात भिजून भांडी घासताना दिसतेय. तिच्या मागे तंबू ठोकून बांधलेलं तिचं छोटंसं घर दिसतंय. इतक्या लहान वयात तिनं सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयात ती कसलीच तक्रार न करता, काम करताना दिसतेय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @kiran_kharade.15 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला ३.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. तर ‘जेवढं मिळतंय त्यातच आनंद मागायला शिका. कारण- जे तुम्हाला मिळतंय, ते अनेकांसाठी स्वप्न आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ते अद्याप कळू शकलेले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “भावा, अगदी सत्य”. दुसऱ्यानं, “हे खरं आहे… पण जेपण भेटलंय, ते फक्त आणि फक्त आई-वडिलांमुळे”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “शेवटी परिस्थितीसमोर कोणाचं काही चालत नाही.” तर एकाने, “काय जीवन आहे दादा, ज्या वयात आईच्या कुशीत असायला पाहिजे, त्या वयात भरपावसात ही ताई धुणंभांडी करतेय. प्रणाम तुझ्या धैर्याला, जिद्दीला”, अशी कमेंट केली.