कोणाचं डोकं कसं चालेल सांगता येत नाही. सध्या अशीच एक भन्नाट कल्पना वापरुन आयफोन टेनच्या मूळ रचनेत बदल करणाऱ्या रोबोटिक्सच्या एका विद्यार्थ्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. या तरुणाने आयफोनमधील पारंपारिक पद्धतीचा कनेक्टर स्लॉट रिप्लेस करुन त्या जागी अॅण्ड्रॉइड फोन्सला असणारा टाइप सी पोर्ट लावला आहे. त्यामुळेच हा आयफोन सध्या दुर्मिळ प्रकारातील आयफोन झालाय. प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर ईबे या ऑनलाइन शॉपिंग साईटवर या फोनला तब्बल १ लाख डॉलर्सची बोली मिळालीय.

केन पिलॉनीलने हा फोन मॉडिफाय केलाय. तो सध्या स्विझ फेड्रल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मास्टर्सचं शिक्षण घेत आहे. मागील महिन्यामध्येच त्याने स्वत:च्या आयफोनमध्ये केलेल्या या बदलाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. पारंपारिक पद्धतीची आयफोनची कनेक्टींग पोर्ट आणि पीन वापरण्याऐवजी तो युएसबी टाइप सी पद्धतीचा कनेक्टर वापरतोय. मात्र हा फोन दिसायला एकदम कूल वाटत असला तरी त्यामध्ये बदल घडवून आणणं कठीण होतं असं केनने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. केनने दिलेल्या माहितीनुसार या मोबाईलमधील मूळ गोष्टींना धक्का न लावता त्यामध्ये बदल करणं हे फार कठीण काम होतं. त्यासाठी मी फार संशोधन केलं आणि फोन खराब होणार नाही अशापद्धतीने काळजी घेत हा बदल केला, असं केन सांगतोय.

आयफोनच्या ओरिजनल पोर्टचा आकार वाढवण्यासाठी केनने विशेष पद्धतीच्या ड्रील मशीनचा वापर केला. त्याने केलेल्या या बदलांनंतर आता हा फोन इतर अॅण्ड्रॉइड फोन्सप्रमाणे केवळ या टाइप सी युएसबीने चार्ज होतो शिवाय या माध्यमातून डेटा ट्रान्सफरही शक्य असल्याचं त्याने म्हटलंय.

ईबेवर आता केनचा हा फोन घेण्यासाठी अनेकांच्या उड्या पडत आहेत. आधी सुरुवातीला एकाने साडेतीन हजार अमेरिक डॉलर्सची बोली लावली. त्यानंतर पुढील २८ तासांमध्ये अनेकांनी मोठमोठ्या बोली लावल्याने बोलीची रक्कम ५० हजार अमेरिकन डॉलर्सपर्यंत गेली. मंगळवारी तर एकाने तब्बल एक लाख १०० डॉलर्सची बोली या फोनसाठी लावली. ७४ रुपये प्रती डॉलर दराप्रमाणे भारतीय चलनात ही किंमत ७४ लाख रुपये इतकी होते.

हा फोन विकून येणाऱ्या पैशांमध्ये आपण असेच प्रयोग करण्यासाठी लागणारं सामान घेणार असल्याचं केनने म्हटलं आहे. अजून आठवडाभर हा लिलाव सुरु राहणार असल्याचंही तो म्हणालाय. मात्र हा फोन दैनंदिन वापरामध्ये वापरता येणार नाही असं केनने आधीच स्पष्ट केलं आहे. तसेच या फोनचा पोर्ट कसा बदलला याची सविस्तर माहिती केनने ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असणाऱ्या गिटहबवर शेअर केलीय. या आयफोनला ७४ लाखांची बोली लागली असली तरी सध्या भारतामध्ये आयफोन टेनची मूळ किंमत ५० हजारांच्या आसपास असून काही वेबसाईटवर हा फोन ४० हजारांनाही उपलब्ध आहे.