EPFO launches New Passbook lite: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (ईपीएफओ)शी संबंधित काही सुधारणा जारी केल्या आहेत. ईपीएफओने आता ‘पासबुक लाइट’ ही एक नवीन सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत ईपीएफओ खातेधारक आता एकाच क्लिकद्वारे त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात.
एकाच लॉगइनमध्ये खात्याची संपूर्ण माहिती
या नवीन ईपीएफओ सुधारणांबाबत पत्रकारांशी बोलताना कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ईपीएफओने त्यांच्या खातेधारकांच्या पोर्टलवर ‘पासबुक लाइट’ नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे. यामुळे खातेधारकांना त्यांच्या खात्यासाठी एक व्यापक पासबुक पाहता येईल. यामध्ये त्यांचे योगदान, पैसे काढणे आणि नवीन शिल्लक रक्कम थेट त्यांच्या पोर्टलवरच दिसेल.
पासबुक लाइट म्हणजे काय?
‘पासबुक लाइट’ हा ईपीएफओ वेबसाइटवर उपलब्ध असलेला इंटरफेस आहे. या फीचरद्वारे खातेधारक कोणत्याही गुंतागुंतीच्या लॉगइन प्रक्रियेशिवाय थेट त्यांचे पीएफ बॅलन्स तपासू शकतात. याआधी खातेधारकांना यूएएन क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा टाकावा लागत असे. मात्र, आता ही प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. खातेधारकांना फक्त त्यांचा यूएएन क्रमांक आणि ओटीपी टाकावा लागेल आणि त्यानंतर ते त्यांचे पासबुक पाहू शकतात. म्हणजेच पासबुक पाहण्यासाठी पूर्वीसारखं लॉगइन करावं लागणार नाही.
पासबुक लाइट कसे वापरावे?
- आधी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला http://www.epfindia.gov.in भेट द्या.
- त्यानंतर पासबुक लाइट ऑप्शनवर क्लिक करा
- आता तुमचा यूएएन क्रमांक टाका
- आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल
- तो ओटीपी टाकून सबमिट करा
- तुमचे पीएफ पासबुक स्क्रीनवर तुम्हाला दिसेल
पासबुक लाइट आवश्यक का आहे?
ईपीएफओ वेबसाइटवर तुमचे पासबुक पाहणे हे एक अवघड काम होते. त्यामुळेच लाखो खातेधारकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत ईपीएफओने पासबुक लाइट हे फीचर सुरू केले. ईपीएफओच्या मते, तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे किंवा नेटवर्क समस्यांमुळे अनेक लोक त्यांची पीएफ खात्याची इत्थंभूत माहिती पाहू शकत नव्हते. मात्र लाइटमुळे ते एकाच लॉगइनद्वारे शक्य होणार आहे.
अकाउंट ट्रान्सफर ऑनलाइन ट्रॅक करणे शक्य
खातेधारकांना त्यांच्या पोर्टलवरून थेट पीडीएफ स्वरूपात फॉर्म के डाउनलोड करता येणार आहे. यामुळे खातेधारकांना त्यांच्या पीएफ अकाउंट ट्रान्सफरची प्रगती ऑनलाइन ट्रॅक करता येऊ शकते. तसंच यामुळे खातेधारकांना त्यांचे पीएफ खाते योग्यरित्या प्रक्रिया केले गेले आहे की नाही हे जाणून घेता येईल. शिवाय खातेधारकांना त्यांचे जुने पीएफ शिल्लक, सेवा कालावधी नीट अपडेट केले आहे की नाही याची माहिती घेता येईल. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी, खासकरून निवृत्तीनंतर ईपीएस पेन्शनची गणना करण्यासाठी, पीएफ खात्याचे अचूक तपशील राखणे खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या पीएफ खात्याचे ट्रान्सफर नवीन नियोक्त्याद्वारे फॉर्म १३द्वारे ऑनलाइन केले जाते.
सध्या ईपीएफओ खातेधारकांना त्यांचे योगदान, आगाऊ पैसे काढणे आणि खात्याचे तपशील मिळवण्यासाठी पासबुक पोर्टलवर स्वतंत्रपणे लॉग इन करावे लागते. नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाते हस्तांतरण अधिक सोयीस्कर करण्यासाठी खातेधारकांना आता पोर्टलवरून थेट पीडीएफ स्वरूपात फॉर्म के डाउनलोड करण्याचा आणि तो सबमिट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे पीएफ खाते हस्तांतरण अधिक जलद, पारदर्शक होणार आहे.
या नवीन सुविधेमुळे पासबुक पोर्टलवरील भार कमी होईल आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. “खातेधारकांसाठी सोयीस्कर व्हावे आणि तक्रारी कमी व्हाव्यात यासाठी एका लॉगइनद्वारे सर्व महत्त्वाच्या ईपीएफ सेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे”, असे मांडविया यांनी यावेळी सांगितले.