लग्नासारखा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आणि तुमच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची परिक्षा असे दोन्ही प्रसंग एकाच दिवशी आले तर… तुम्ही कोणता पर्याय निवडाल? खरे तर दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. असेच धर्मसंकट तेलंगणाच्या चोवीस वर्षीय तरुणीवर आले होते. ज्या मुहूर्तावर तिचे लग्न ठरले होते त्या मुहूर्तावर तिची डीएडची परिक्षा होती. ऐनवेळी परिक्षेचे वेळापत्रक घोषित झाल्याने संभ्रमात पडलेल्या या नववधुने अखेर यासाठी लग्नाचा मुहूर्त काही काळ लांबणीवर टाकला.
तेलंगणामधल्या रचना अल्लुरी हिचे २५ नोव्हेंबरला लग्न होते. तिला शिक्षक बनायचे होते. तिची डिएडची परिक्षा याच दिवशी होती. लग्नाचा मुहूर्त आणि परिक्षेची वेळ एकच असल्याने नक्की कशाची निवड करावी असा संभ्रम तिलाही होता. पण तिच्या होणा-या नव-याने आणि त्याच्या कुटुंबियांनी मात्र तिला करिअरला प्राधान्य देण्याचे सांगितले. तसेच तिच्यासाठी लग्नाचा मुहूर्तही पुढे ढकलला. रचना हिची परिक्षा ऑक्टोबर महिन्यात होणे अपेक्षित होते. म्हणूनच, कुटुंबियांनी नोव्हेंबर महिन्यात लग्नाची तारिख ठरवली होती. पण काही कारणाने या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. परिक्षेची तारिख २५ नोव्हेंबर होती. दुपारी १० ते १२ मध्ये तिचा पेपर होता. तर लग्नासाठी ११ चा मुहूर्त होता. जर तिने ही परिक्षा चुकवली असती तर तिचे एक वर्ष वाया गेले असते. यावेळी तिच्या सासरच्या मंडळीने समजूतदारपणा दाखवत लग्नाचा मुहूर्त काही तासांसाठी पुढे ढकलला. सासरच्या मंडळीच्या या निर्णयामुळे रचना परिक्षा देऊ शकली. ‘द न्यूज मिनिट’ने ही बातमी दिली. त्यामुळे मुलीच्या करिअरला प्राधान्य देणा-या तिच्या सासरच्या मंडळींची आणि तिच्या पतीची वाहवा होत आहे.