पराठा हा अनेकांच्या आवडीचा विषय. मग कधी ट्रीपला जाताना म्हणून तर कधी सुटीच्या दिवशी घरी असल्यावर गरमा गरम खाता येतील म्हणून हा बेत केला जातो. बटाट्यापासून ते पनीरपर्यंत वेगवेगळे पराठे होऊ शकतात. बहुतेकांचा नाश्ता किंवा जेवणासाठी पराठा हा आवडीचाच पदार्थ असतो. हेच लक्षात घेऊन एका हॉटेलमालकाने एक अनोखी योजना जाहीर केली आहे. ही योजना ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या ठिकाणचे ३ पराठे खाणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी या हॉटेलमध्ये मोफत जेवण मिळेल अशी ही योजना आहे.

दिल्ली-रोहतक बायपास रोडवर असलेल्या तपस्या नावाच्या पराठा हाऊसमध्ये ही अनोखी योजना देण्यात आली आहे. आता ३ पराठे खाणे यात काय विशेष असे तुम्हाला वाटेलही. पण हे तीन पराठे साधेसुधे नसून १ फूट ६ इंचाचा एक पराठा आहे. इतकेच नाही तर या पराठ्याचे वजनही १ किलो आहे. यातही हे ३ पराठे ५० मिनिटांच्या आत खाण्याची अट यामध्ये ठेवण्यात आली आहे. या अनोख्या योजनेमुळे हे पराठा हाऊस प्रसिद्ध असून याठिकाणाहून प्रवास करणारे असंख्य नागरिक याठिकाणी जेवणासाठी थांबतात. आतापर्यंत अनेकांनी अशाप्रकारे पराठा खाण्याचा प्रयत्नही केला आहे. मात्र पराठ्याचा आकार पाहता आतापर्यंत कोणालाच ते जमलेले नाही. या दुकानातील ही अनोखी योजना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यामध्ये ३० पराठ्यांचे प्रकार खवय्यांसाठी ठेवण्यात आले आहेत. ते तूपामध्ये तयार केले जातात. या दुकानाला १० वर्षे झाली असून देशातील सर्वात मोठ्या आकाराचा पराठा आपल्याकडे मिळत असल्याचा दावा या पराठा हाऊसच्या मालकाने केला आहे. पण जर कोणी हे चॅलेंज पूर्ण करु शकलेच तर त्या व्यक्तीची आयुष्यभरासाठी जेवणाची सोय होणार हे निश्चित.